
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयातील अभिलेखा कक्षातून कल्याणमधील बेकायदा ‘युसूफ हाईट्स’ इमारतीसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची गोपनीय फाईल चोरीला गेली आहे. या फाईलला पाय कसे काय फुटले? ही फाईल कुणी उडवली याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात सुरू आहे. या धक्कादायक घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून पोलीस तक्रारीनंतर फॉरेन्सिक पथकाकडून या प्रकरणाची तपासणी सुरू आहे.
कल्याणमधील बेकायदा ‘युसूफ हाईट्स’च्या फाईलमध्ये इमारतीच्या बांधकाम परवानग्या, नोटिसा, पत्रव्यवहार, मोजमाप पथकाकडून तपासणी सुरू कारवाई संबंधी कागदपत्र अहवाल तसेच कायदेशीर आहेत. ही फाईल अचानक गहाळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी आयुक्तांना माहिती दिली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकालादेखील पाचारण करण्यात आले असून त्यांनी पालिका मुख्यालयात दाखल होऊन अभिलेखा कक्षाची पाहणी केली आहे. विशेषतः अभिलेखा कक्षात ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली जात असून नगररचना विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे.
सीसीटीव्ही तपासणार
अभिलेखा कक्षातील संभाव्य पुरावे, बोटांचे ठसे आणि अन्य तांत्रिक बाबींची तपासणी सुरू आहे. फाईल नेमकी कशी आणि कुणी चोरी केली याचा उलगडा करण्यासाठी मुख्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे.


























































