Thane news – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वेळ मिळेना; शासकीय भवन, फूल मार्केट, समाज विकास हॉलचे उ‌द्घाटन लटकले

मागील दोन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीत अडकलेल्या उरण नगर परिषदेने पूर्ण केलेल्या शासकीय भवन, फूल मार्केट, समाज विकास हॉल इमारतीच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळेना. त्यामुळे 19 कोटी खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पांचे उद्घाटन लटकले आहे. प्रकल्प बांधून तयार झालेले असतानाही उद्घाटन होत नसल्याने उरणकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

उरण नगर परिषदेने 11 कोटी खर्चाचे प्रशासकीय भवन, साडेचार कोटींचे फूल मार्केट आणि चार कोटी खर्चाचे समाज विकास केंद्र उभारण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनांमधून ही 19 कोटी 50 लाख खर्चाची विकासकामे मार्गी लागली आहेत. तिन्ही प्रकल्पांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. लोकसभा निवडणूक, आचारसंहितेच्या नावाखाली हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले. आता आचारसंहिता संपून अनेक महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी उद्घाटन केले जात नाही. आता भाजपचे आमदार महेश बालदी यांनी या वास्तूंच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस यांना आणण्याचा हट्ट धरला आहे. मात्र फडणवीस यांना वेळच नसल्यामुळे या प्रकल्पांचे उद्घाटन लटकले आहे.

मुख्याधिकाऱ्यांची सारवासारव

विकास प्रकल्पांचे लवकरात लवकर उद्घाटन व्हावे यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. प्रमुख पाहुण्यांच्या तारखा या महिन्याच्या अखेरपर्यंत निश्चित करण्यात येणार आहेत. त्यांच्या तारखा निश्चित झाल्यानंतर तिन्ही प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे, अशी सारवासारव उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांनी केली.