बदलापूरमधील दोन चिमुरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच आता गोरगरीब मुलींच्या शिक्षणाचे हक्काचे ठिकाण असलेल्या आश्रमशाळा आणि होस्टेलही सुरक्षित नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहापूर तालुक्यात 23 हून अधिक आश्रमशाळा आहेत. मात्र अनेक आश्रमशाळा आणि निवासी वसतिगृहात सीसीटीव्ही बंद आहेत. रेक्टर, सुरक्षारक्षकांची कमतरता असल्याने दोन हजारांहून अधिक मुलींची सुरक्षाच वाऱ्यावर आहे. सरकारचे लक्ष नसल्याने विद्यार्थिनींना कुणी वालीच नाही.
शहापूर तालुक्यातील 23 आश्रमशाळेत अतिदुर्गम आदिवासी गावपाड्यातील गोरगरीब मुले-मुली शिक्षण घेतात, परंतु या शाळामध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. अनेक आश्रमशाळांमध्ये महिला अधीक्षिका, महिला शिपाई यांची रिक्त पदे आहेत. बंद पडलेले सीसीटीव्ही शोभेचे बनले आहेत. आश्रमशाळेतील मुली रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन असतात. रात्री कुणाची तब्येत बिघडली तर सकाळी उजाडल्याशिवाय उपचारही मिळत नाहीत. लहान मुलींच्या देखभालीसाठी तर सेविकाच नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
■ पेंडरघोळ आदिवासी आश्रमशाळेत 200 हून अधिक मुली पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेतात. या ठिकाणी केवळ एक महिला अधीक्षिका200 मुलींचा सांभाळ करीत.
■ शिरोळ आश्रमशाळेत 150 मुलींसाठी फक्त एक अधीक्षिका आणि रोजंदारीवर एक सफाई कर्मचारी आहे. या ठिकाणी संरक्षक भिंतीही नाहीत. समाजकंटक, गर्दुल्ले यांचा या ठिकाणी कायम वावर असतो.
■ विहिगाव, माळ आश्रमशाळेत 128 मुली शिक्षण घेतात, परंतु या शाळेत अधीक्षिका नाही. रोजंदार सफाई कर्मचारी महिलेकडे मुलींची जबाबदारी आहे.
■ कोठारे, शेणवा आश्रमशाळेत मुलींच्या सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना नाहीत.
रोडरोमियोंचा गराडा
आश्रमशाळा, वसतिगृहाबाहेर रोडरोमियोंचा गराडा असतो. त्यामुळे शहापूर तालुक्यात बदलापूरची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्याने मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी वाऱ्यावर आहे.