सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयातील तर्राट सफाई कामगाराने निर्भया पथकाची गाडीच पळवली; धिंगाणा घालत नागरिकांनाही केली मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणारी निर्भया पथकाची गाडी चक्क एका तर्राट सफाई कामगाराने पळवल्याची घटना उघडकीस आली आहे. राम पवार असे या माथेफिरू सफाई कामगाराचे नाव असून तो खारघरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे. त्याने निर्भया पथकाच्या गाडीचा धाक दाखवत बेलपाडा परिसरात चांगलाच धिंगाणा घातला व नागरिकांना मारहाणही केली. याप्रकरणी माहिती मिळताच खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

राम पवार हा सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात साफसफाई व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाणी देण्याचे काम करतो. २ मार्चला होळीच्या दिवशी त्याने दारू ढोसली आणि टल्ली झाला. यावेळी बेभान झालेला राम कोणतीही पर्वा न करता कार्यालयाच्या प्रांगणात उभ्या असलेल्या निर्भया पथकाच्या गाडीत बसला व गाडी घेऊन निघून गेला.

बेलपाडा परिसरात पोहोचताच एका रिक्षाचालकासोबत त्याचा वाद झाला. यावेळी संतापलेल्या रामने गाडीतून उतरत शिवीगाळ करण्यात सुरुवात केली. त्याने पोलिसांच्या गाडीचा धाक दाखवत हुल्लडबाजी केली. अखेर त्याने दारू ढोसल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली असता खारघर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

निर्भया पथकाचा धाक दाखवत गोंधळ घालणाऱ्या दारुड्या राम पवारचा व्हिडीओ संतप्त नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद करत सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओच्या मदतीने पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कार्यालयातील गाडीची चावी त्याच्या हाती कशी लागली? त्याने कार्यालयात घुसून ही चावी घेतली का? याचा तपास पोलीस करत आहेत.