
कर्जत-खालापूर विधानसभा क्षेत्राचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपले पती अॅड. तृषांत आरडे यांना मारहाण करून त्यांचे अपहरण केले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून माझ्या पतीचा शोध लागत नाही. त्यांचे अपहरण आमदार थोरवे यांच्या इशाऱ्यावरून त्यांच्या पंटरांनी केला असल्याचा गंभीर आरोप अॅड. तृषांत आरडे यांच्या पत्नी किशोरी आरडे यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे.
माझे पती तृषांत आरडे हे अनुसूचित जाती वर्गातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. २४ जुलै रोजी त्यांना आमदार थोरवे यांचे पंटर मनीष भगत आणि विकास भगत यांनी मारहाण केली होती. त्यावेळी आमच्या गाडीवरदेखील हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी आम्ही ११२ क्रमांकावर कॉल करून पोलिसांची मदत मागितली, पण पोलीस आमच्या मदतीला आले नाहीत. त्यानंतर आमदार थोरवे यांच्या पंटरांनी माझ्या पतीला मारहाण करून त्यांचे अपहरण केले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मी आणि माझे कुटुंब माझ्या पतीचा शोध घेत आहोत, मात्र त्यांचा कुठेही शोध लागलेला नाही. केसेस मागे घेण्यासाठी आमदार थोरवे हे माझ्या पतीला नेहमीच धमकावत होते. त्यांच्याच सांगण्यावरून हे कृत्य झाल्याचा आरोपही किशोरी आरडे यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही. मी आरडे पती आणि पत्नीला ओळखत नाही. त्यामुळे किशोरी आरडे यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली आहे.
पतीचे अपहरण आमदार थोरवे यांच्या इशाऱ्यावरून झाले आहे, हे लक्षात घेऊन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा. यासाठी मी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची भेट घेतली आहे. यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे, असेही किशोरी आरडे यांनी सांगितले आहे.