महानगर गॅस लाईनच्या कामासाठी बालकामगार जुंपले, शिवसेनेचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महानगर गॅस लाईनच्या कामासाठी बालकामगार जुंपल्याचा प्रकार डोंबिवलीत समोर आला आहे. पेंडसेनगर गल्ली क्रमांक 1 येथे महानगर गॅस लिमिटेडच्या गॅस लाईन जोडणीचे काम सुरू आहे. हे काम बालकामगारांकडून केले जात असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख हेमंत गिमावकर यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात केडीएमसीचे आयुक्त, महावितरणकडे लेखी तक्रार केली आहे.

पेंडसेनगर रोड क्रमांक 1 येथे 2 जुलै 2025 रोजी महानगर गॅस लाईन टाकण्याचे काम सुरू होते. मात्र महानगरच्या ठेकेदाराने हे काम अर्धवटच ठेवले. उखडलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. याची दखल घेऊन शाखाप्रमुख हेमंत गिमावकर आणि अनुज मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून रस्त्याचे काम करून घेतले. पुन्हा 30 मार्च रोजी ठेकेदाराने रस्ता खोदायला सुरुवात केली. याबाबत ठेकेदाराला विचारणा करण्यात आली असून याची परवानगी घेतली आहे व त्यानुसार खोदकामास सुरुवात केली असे उत्तर ठेकेदाराने दिले.

पाणीपुरवठा पाईपलाईन आणि विद्युत लाइन या ठिकाणी असल्याची पूर्वकल्पना ठेकेदाराला देण्यात आली. मात्र तरीही त्याने खोदकाम सुरू ठेवले. या कामादरम्यान गुरुवारी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आणि याचा मनस्ताप ग्रामस्थांना सहन करावा लागला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महानगर गॅस कंपनीचे अधिकारी उमेश आरोटे यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर कल्याण येथील महानगर गॅस कंपनीचे कार्यालय गाठून अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले असता अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट नाकारली. कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग आणि महावितरणला निवेदन देण्यात आले आहे.