शहापुरातील दहा विद्यार्थ्यांची इस्रो भरारी ! विमान प्रवासाचा मिळणार अनुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिशन भरारी उपक्रमांतर्गत विमान प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. शहापूर तालुक्यातील 10 विद्यार्थ्यांची या उपक्रमासाठी निवड झाली असून त्यांना इस्रोचीही भेट घडवून दिली जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान, तंत्रज्ञान व अवकाशाबद्दल कुतूहल निर्माण व्हावे यासाठी हा अनोखा उपक्रम उपयोगी पडणार आहे.

मिशन भरारी या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील इयत्ता पाचवी, सहावी, सातवी व आठवी या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयांच्या केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यात शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शेलवली शाळेचे स्नेहल बांगर व जिया हलपतराव (इयत्ता आठवी), साई निमसे (इयत्ता सातवी), अस्नोली शाळेतील आरुष दिनकर (इयत्ता सहावी), अक्षदा दिनकर (सातवी), आष्टे शाळेतील येथील जितेंद्र करण व आर्यन वरकुटे (इयत्ता 5वी), मुगाव शाळेतील ईश्वरी विशे (इयत्ता सातवी), खराडे शाळेतील वैष्णवी बोंद्रे (इयत्ता 6वी) व जिल्हा परिषद शाळा धसईची काव्या दाखले (इयत्ता 8वी) या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा

जिल्हास्तरावर निवड झालेले गुणवत्ताधारक विद्यार्थी फेब्रुवारी व मार्चदरम्यान देशातील नामांकित वैज्ञानिक केंद्रांना भेटी देणार आहेत. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना विमानवारी करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधन, अवकाश विज्ञान, आधुनिक प्रयोगशाळा व नव्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे. त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीस नवी दिशा मिळणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.