मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बिल्डरने शाळेत सोडले सांडपाणी; शेकडो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी भयंकर खेळ

बांधकाम साईटवरील कामगारांच्या झोपड्यांमधील संरक्षक भिंतीला चार भगदाडे पाडून बिल्डरने तेथील मलमूत्र थेट शाळेच्या प्रांगणात सोडल्याचा धक्कादायक प्रकार कळव्यात समोर आला आहे. आशर या बांधकाम व्यावसायिकाने हा कारनामा केला असून हजारो विद्यार्थ्यांसह शिक्षकांना या सांडपाण्याच्या दुर्गंधीने नाक मुठीत घेऊन दिवस ढकलावे लागत आहेत. याबाबत शाळा व्यवस्थापनाने पालिकेकडे अनेकदा तक्रार केली आहे. मात्र हा बिल्डर मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचा मानला जात असल्याने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बिल्डरमुळे या शाळेचा परिसर अक्षरशः नाला झाला आहे.

कळवा येथील मुंबई-पुणे रस्त्यावर असलेल्या सह्याद्रीनगर येथे सहकार विद्या प्रसारक मंडळाची शाळा आहे. या शाळेत जवळपास 4 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या बाजूला आशर बिल्डरच्या नवीन टॉवरचे बांधकाम सुरू असून येथे मजुरांनी वसाहत बांधली आहे.

दरम्यान कामगारांच्या वसाहतीमधील मलमूत्रयुक्त सांडपाणी मुख्य नाल्यामध्ये न सोडता शाळेच्या भिंतीला चार ठिकाणी फोडून ते सांडपाणी शाळेच्या आवारात सोडण्यात येते आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाले असून बऱ्याच विद्यार्थ्यांना मलेरिया, डेंग्यू, कावीळ यांसारखे आजार झाल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे.

पत्रे टेकवून नाल्याची वाट अडवली

कायमस्वरूपी सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी मुख्य नाल्याला जोडणारा छोटा नाला बांधून त्याद्वारे निचरा होईल याची दक्षता बिल्डरने घेतली नाही. दरम्यान येथील नाल्याची वाट पत्रे टेकवून बंद केली असल्याने बिल्डरला नाला गिळंकृत करायचा आहे का, असा सवाल संतप्त पालकांनी विचारला आहे.

“डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. शाळेतील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना साथीच्या रोगांची लागण झाली आहे. तसेच विद्यार्थी आणि पालकांना नाकावर रूमाल ठेवून शिक्षण घेत आहेत. पालिका प्रशासनाने यावर तत्काळ तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

चंद्रकांत विधाटे, (उपाध्यक्ष – सहकार विद्या प्रसारक मंडळ)