रोहित पक्ष्याचं ठाणं

62

अनंत सोनवणे,[email protected]

मुंबईच्या आसपास खाडीकिनाऱयाच्या रूपानं पक्ष्यांसाठी आदर्श अधिवास नैसर्गिकरीत्या निर्माण झालाय. ठाणे खाडीचा पश्चिम किनारा म्हणजे तर फ्लेमिंगोंचं नंदनवनच!

कोणत्याही ठिकाणचं पक्षीजीवन हे खूप मोठय़ा प्रमाणावर तिथल्या पाणथळ जागांवर अवलंबून असतं. पाणथळ जागा जितक्या अधिक व सुरक्षित, तितकं तिथलं पक्षीवैविध्य अधिक असतं. मुंबईच्या आसपास खाडीकिनाऱयाच्या रूपानं पक्ष्यांसाठी आदर्श अधिवास नैसर्गिकरीत्या निर्माण झालाय. तिथली दलदल, खारफुटी, घरटं व विणीच्या दृष्टीने आवश्यक अबाधित वातावरण हे सारं पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पोषक ठरतं. त्यामुळेच हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱया आकर्षक फ्लेमिंगो पक्ष्यांनी मुंबई आणि ठाणे शहरालगतच्या खाडीकिनाऱयांची निवड केली तर त्यात नवल वाटू नये. विशेषतः ठाणे खाडीचा पश्चिम किनारा म्हणजे तर फ्लेमिंगोंचं नंदनवनच! 2015 मध्ये या पश्चिम किनाऱयालगतचा 1690.50 हेक्टर परिसर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून जाहीर करण्यात आला.

मराठीत ‘रोहित’ नावाने ओळखला जाणारा फ्लेमिंगो हा पाणथळ जागी थव्याने राहणारा पक्षी आहे. उंच मान, लांब पाय आणि गुलाबी रंगाची पिसं ही त्याची प्रमुख वैशिष्टय़ं. जगात प्रामुख्याने उष्ण कटिबंधात फ्लेमिंगोचं अस्तित्व आढळतं. आफ्रिकेत त्याची मोठमोठी वसतिस्थानं आहेत. हिंदुस्थानी बहुतांश फ्लेमिंगो कच्छच्या रणामधले रहिवासी आहेत. जगात फ्लेमिंगोच्या सहा प्रजाती आढळतात. त्यापैकी मोठे आणि छोटे फ्लेमिंगो ठाणे खाडी अभयारण्यात भेट देतात. नोव्हेंबरच्या सुरुवातीला युरोपात थंडीचा कडाका सुरू झाला की, फ्लेमिंगो स्थलांतर करतात. सैबेरिया, कच्छ इथून खाद्याच्या शोधात ते हजारो किलोमीटरचा प्रवास  करतात. छोटे मासे, किडे, पाणवनस्पती, शेवाळ हे त्यांचं मुख्य खाद्य ठाणे खाडी अभयारण्यात विपुल प्रमाणात असल्यानं ते पुढचे सहा-सात महिने इथंच मुक्काम ठोकतात. त्यांच्या चोचीच्या वैशिष्टय़पूर्ण आकारामुळे त्यांना चिखलातलं खाणं शोधणं, चिखलातं घरटं बनवणं सोपं जातं. हजारो फ्लेमिंगोंच्या वास्तव्यामुळे अभयारण्याचा खाडी किनारा गुलाबी चादर पांघरल्यासारखा भासतो. फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या अखेरीस फ्लेमिंगो परतीचा प्रवास सुरू करतात.

flamingo

फ्लेमिंगो हे ठाणे खाडी अभयारण्याचं प्रमुख वैशिष्टय़ असलं तरी वन्य जीवप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी इथं भरपूर काही आहे. इथं माश्यांच्या 7, कीटकांच्या 68, फुलपाखरांच्या 29, खारफुटीच्या 9, पाणवनस्पतींच्या 37 प्रजाती आढळतात. तसंच पक्ष्यांच्या 150 हून अधिक प्रजाती पाहायला मिळतात. त्यात अनेक पक्षी फ्लेमिंगोसारखे स्थलांतरित आहेत. काळय़ा शेपटीचा पंकज हा पक्षी लडाख, युरोप आणि कच्छमधून इथं येतो. युगलिन गल्फ, सँड पायपर्स, सँड ब्लोवर्स, पायर्ड ऍवोकेट, रेडशँक, व्हिस्कर्ड टर्न वगैरे पक्षी युरोपातून येतात. लेसर व्हिसलिंग डक, कॉमन टिल डक, नॉर्थन शॉवलर, स्पॉट-बिल्ड डक इत्यादी बदकांच्या जातीही इथं पाहायला मिळतात. खाडीकिनारी ग्रेटर स्पॉटेड ईगलचं प्रजनन होत असल्याचाही अंदाज आहे. याशिवाय इथं इंडियन स्किमर, पेंटेड स्टॉर्क, ब्लॅक-हेडेड आयबिस, व्हाईट बेलीड सी-ईगल, युरेशियन कर्ल्यू, कॅस्पियन टर्न, ब्लॅक बेलीड टर्न, पेंटेड स्टॉर्क असे अनेक प्रकारचे पक्षी दिसतात. इथं पॅसिफिक गोल्डन प्लॉवर दिसल्याचीही नोंद आहे.

पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकारांच्या सोयीसाठी खाडीमधून बोटीने फेरफटका मारण्याची सुविधा उपलब्ध आहे. संथ गतीने, पक्ष्यांना त्रास न देता या बोटी पाण्यातून प्रवास करतात व आपल्याला पक्ष्यांचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळवून देतात. शिवडी-उरणसारख्या महत्त्वाच्या खाडी क्षेत्रात सुरू झालेल्या विकास प्रकल्पांच्या बांधकामांचा परिणाम फ्लेमिंगोंच्या स्थलांतरणाच्या पट्टय़ावर होतोय. ते आता गोराई, मालाड खाडीकडे सरकताना दिसतायत. त्यामुळे गोराईतही पक्षी अभयारण्य जाहीर करावं अशी संकल्पना शिवसेना पक्षप्रमुख वन्य जीवप्रेमी उद्धव ठाकरे यांनी मांडलीय. गोराईसारख्या अन्य अधिवासांनाही असं कायद्याचं संरक्षण मिळायला हवं. तरच फ्लेमिंगो आणि अन्य पक्ष्यांचा अधिवास वाचेल, खारफुटी वाचेल आणि महानगरी मुंबईसुद्धा नैसर्गिक आपत्तीपासून वाचेल.

प्रमुख आकर्षण…फ्लेमिंगो

जिल्हा…ठाणे

राज्य…महाराष्ट्र

क्षेत्रफळ…16.90 चौ कि.मी.

निर्मिती…6 जुलै 2015

जवळचे रेल्वे स्थान…ठाणे (11 कि.मी.)

जवळचा विमानतळ…मुंबई (18 कि.मी.)

निवास व्यवस्था…अनेक खासगी हॉटेल्स

सर्वाधिक योग्य हंगाम…नोव्हेंबर ते फेब्रुवारी

सुट्टीचा काळ…पावसाळय़ात बोटिंग बंद

साप्ताहिक सुट्टीचा दिवस…नाही

 

आपली प्रतिक्रिया द्या