वाहतूक पोलिसांना यंदाची गटारी चांगलीच पावली आहे. दीप अमावास्येच्या रात्री गटारी साजरी करून वाहन चालवणाऱ्या दिवट्यांवर नजर ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवली. या मोहिमेत ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह, विना हेल्मेट, सिग्नल जम्पिंग तसेच नियम मोडणाऱ्या 523 वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारत साडेचार लाखांची गटारी वसुली करत दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या.
अमावास्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांची विविध नाक्यांवर तपासणी करण्यात आली. या कारवाईत गुन्हे अन्वेषण विभाग, स्थानिक पोलीस, गस्ती पथक आणि वाहतूक पोलिसांच्या पथकाने एकत्रित कारवाई केली. यामध्ये शनिवारी एका रात्रीत एकूण 1 हजार १०९ वाहने तपासण्यात आली. त्यापैकी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या 523 वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यावेळी गटारी साजरी करण्याच्या नादात दारू पिऊन वाहन चालवणारे 47 मद्यपी चालक पोलिसांच्या तावडीत सापडले. तर विना हेल्मेट 110 दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत रविवारी पहाटेपर्यंत कारवाई करून 4 लाख 59 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
35 पथके, 550 कर्मचाऱ्यांची टीम कामाला
राज्यात सध्या ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह आणि हिट अँड रन प्रकरण चांगलेच चर्चिले जात असताना नशेखोरांमुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेक जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे गटारीच्या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असे प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. प्रत्येक पोलीस स्टेशनमागे वाहतूक पोलिसांची दोन पथके अशी एकूण 35 पथके तैनात करण्यात आली होती. ठाणे वाहतूक पोलिसांची एकूण 550 कर्मचाऱ्यांची पथके कामाला लावली होती.
येऊरच्या मार्गावर पोलिसांचा वॉच
या कारवाईला ऑपरेशन ऑल आऊट असे नाव देण्यात आले. यामध्ये सिग्नल जम्पिंग 2, सीट बेल्ट न लावणे 34, मोबाईलवर बोलून वाहन चालवणे 2, विना परवाना वाहन चालवणे 29, रिक्षाचालकाने गणवेश परिधान न केलेले 28 व इतर 82 दोषींवर कारवाई करण्यात आली तर येऊरच्या जंगलात व छुप्या मार्गांवरदेखील पोलिसांनी नजर ठेवली होती, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.