
घोडबंदरमधील ऋतू एन्क्लेव्ह सोसायटीमध्ये वृक्षांची छाटणी करताना असंख्य पक्षी मेल्याची घटना ताजी असतानाच आता ठाणे शहरातील भटके कुत्रे अचानक गायब होऊ लागल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. केबल वायरचा फास तयार करून कुत्र्यांना त्यात जेरबंद करून गायब करण्याचा गोरखधंदाच सुरू झाला आहे. या भटक्या कुत्र्यांना चोरून लपून पळवून नेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा सापळा घेऊन फिरणारे चौघेजण कोण, ते कुठून आले, असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून श्वानांची कत्तल करणारे मोठे रॅकेट यामागे असल्याचा संशयही ठाणेकरांनी व्यक्त केला आहे.
मुंबईच्या वेशीवर असलेल्या कशिश पार्क, परब वाडी, मुलुंड चेक नाका, रहेजा या परिसरातून गेल्या काही दिवसांत भटके कुत्रे गायब झाले आहेत. सकाळच्या सुमारास सहा ते सात तरुण येतात, सोसायटीमध्ये फेरफटका मारतात आणि भटक्या कुत्र्यांना लक्ष्य करून त्यांना पकडतात. तसेच एका गोणीत घालून त्यांना घेऊन जातात. या भागातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच प्राणिमित्रांनी या टोळीचा कारनामा आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
निर्बिजीकरण बंद
ठाणे पालिका प्रशासनाकडून श्वानांची निर्बिजीकरण मोहीम सध्या बंद आहे. त्यामुळे श्वानांना पकडण्यासाठी शहरात फिरणारे एकही पथक पालिकेचे नाही. त्यामुळे कुत्रे पकडणाऱ्या त्या तरुणांचा पालिकेशी काही संबंध नाही, अशी माहिती पालिकेच्या पशुसंवर्धन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
मागील काही महिन्यांपासून भटके कुत्रे गायब होण्याचे प्रकार सतत घडत आहेत. काही संशयास्पद तरुण दररोज येतात आणि भटके कुत्रे घेऊन जातात. याप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्त, ठाणे पालि का आयुक्त, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून याची तपास करण्यात यावा. – मंदार कोळेकर (श्वानप्रेमी)