शिक्षिकेच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याने जीवन संपवलं

म्हारळमधील सेक्रेड हार्ट महाविद्यालयात विद्यार्थ्याला संस्थाचालकांनी बेदम मारहाण करून लिव्हिंग सर्टिफिकेटवर लाल शेरा मारल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच कल्याणच्या 13 वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विघ्नेश पात्रा असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

आत्महत्येपूर्वी विघ्नेशने सुसाईड नोट लिहिली असून त्यात शिक्षिका आणि एका मुलाचा उल्लेख केला आहे.
कल्याणमधील शिवाजी कॉलनी चिकणीपाडा परिसरात विघ्नेश हा वडील प्रमोदकुमार, आई आणि बहिणीसोबत राहात होता. तो एका नामांकित शाळेत आठवी इयत्तेत शिक्षण घेत होता. रविवारी विघ्नेशचे वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले तर आई व बहीण कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. घरात कुणीही नसल्याने सायंकाळी 7 च्या सुमारास विघ्नेशने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विघ्नेशचा मृतदेह ताब्यात घेतला. विघ्नेशजवळ एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये एका मुलासह शिक्षिकेचा उल्लेख आहे. या दोघांनी चिडवल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेची कोळशेवाडी पोलिसांनी नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.

कठोर कारवाई करा!

काही दिवसांपूर्वी वरप येथे सेक्रेड हार्ट शाळेतील अनिश दळवी या विद्यार्थ्याने शाळाचालकांच्या मनमानीला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणात शाळेचा चेअरमन अल्विन अँथोनी याला टिटवाळा पोलिसांनी अटक केली होती. शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून मुले आत्महत्या करू लागल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी पालकांनी केली आहे.