यवतमधील जमावबंदी अखेर प्रशासनाने हटवली; जनजीवन पूर्वपदावर

यवत येथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले होते. पुन्हा मंगळवार आणि बुधवारी 5 तास अंशतः शिथिल केले होते. मात्र, गावात शांतता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री 12 पासून जमावबंदी हटवल्याने यवतचे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

यवत गावात तणावपूर्ण शांतता असतानाच, गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळीची घटना घडली होती. प्रतिबंधात्मक आदेश म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केले होते. जमावबंदी आदेश लागू केल्यापासून गावात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, त्यामुळे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. यानंतर तहसीलदार शेलार यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्याने डुडी यांनी जमावबंदीचे आदेश बुधवारी हटवल्याचा आदेश काढला. सहा दिवसांनंतर विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पोलिसांचा बंदोबस्त कायम असणार आहे.

सहा दिवस बंद असलेली बाजारपेठ आज सकाळपासून सुरू झाली. यवत गावात दोन समाजांमध्ये सामाजिक सलोखा राहावा, यासाठी यवत पोलीस ठाण्यात दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या उपस्थितीत शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.