
मुंबई, महाराष्ट्रासह जगभरातील आंबा खवय्यांसाठी विशेष आकर्षण असलेल्या हापूसचा घमघमाट आता नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये वाढू लागला आहे. मार्केटमध्ये आंब्याची आवक दररोज थेट ३५ हजार पेट्यांपर्यंत गेल्याने दर २ ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान आले आहेत. हंगाम सुरू झाल्यापासून आंब्याचे दर चढेच राहिले होते. मात्र आता आवक वाढल्यामुळे दर कमी होऊ लागल्याने हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागला आहे. १० एप्रिलनंतरही हापूसची आवक ४० ते ५० हजार पेट्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
परतीच्या पावसाचा वाढलेला मुक्काम, मध्यंतरी पडलेला आवकाळी पाऊस, अचानक वाढलेली थंडी या नैसर्गिक अपत्तींमुळे यंदा हापूसच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. हवामानातील या बदलांचा पहिल्या आणि दुसऱ्या मोहोरला मोठा फटका बसल्याने यंदा हापूसचा हंगाम उशिराने सुरू झाला. सुरुवातीला आवक कमी असल्यामुळे आंब्याचे दर चढे होते. पेटी आठ ते १२ हजार रुपयांपर्यंत विकली जात होती. मात्र आता एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातून दरदिवशी सुमारे २२ हजार पेट्या येऊ लागल्या आहेत. अन्य राज्यांतील हापूसच्या पेट्यांची आवक थेट १३ हजार पेट्यांपर्यंत गेली आहे. त्यामुळे हापूसचे दर कमी झाले आहेत. कोकण हापूसच्या तुलनेत अन्य राज्यांतील हापूस कमी दराने विकला जात आहे.
एक महिना जोरदार हंगाम
हापूसची आवक सध्या ३५ हजार पेट्यांपर्यंत असली तरी एप्रिलमध्ये ही आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. १० एप्रिलनंतर हिच आवक थेट ४० ते ५० हजार पेट्यांपर्यंत जाणार आहे. हा सुरू झालेला हंगाम येत्या ५ ते १० मेपर्यंत असाच राहणार आहे. त्यानंतर जुन्नर हापूसचा हंगाम सुरू होणार आहे. यंदा हापूस उत्पादन फक्त २० टक्के असल्याने दर चढेच राहणार आहेत, अशी प्रतिक्रिया एपीएमसीच्या फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे.
पहिली खेप अमेरिकेला रवाना
कोकण हापूसला जगभरातून चांगली मागणी आहे. मात्र यंदा युद्ध सुरू झाल्यामुळे आंब्याच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. युद्धामुळे हवाई मार्गाने आंबा अमेरिकेत पाठवण्यात आला आहे. पहिली खेप सुमारे १ हजार २०० किलो आंब्याची रवाना करण्यात आली आहे.





























































