आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेचा चिमुरडा ठरला बळी; सर्पदंशानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू

खटाव तालुक्यातील शिरसकडी गावचा एक चिमुरडा आरोग्य यंत्रणेच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा व अनास्थेचा बळी ठरला. सर्पदंश झाल्यानंतर या बालकाला तेथेच उपचार न करता सातारला न्यायला लावल्यामुळे ‘गोल्डन अवर’ हातून निसटला आणि उपचारांअभावी या बालकाला तडफडून जीव गमवावा लागला.

अथर्क प्रमोद कवळे (वय 5) असे या दुर्दैकी बालकाचे नाव आहे. मंगळवारी (18 रोजी) सायंकाळी घराजवळच खेळत असताना अथर्वला सर्पदंश झाला. त्याने घरात येऊन आपल्याला साप चावल्याचे सांगितले. उजव्या हाताच्या बोटाला सापाचा दंश झाला होता. हे पाहून आई-वडिलांसह सर्वजण हादरून गेले.

कुटुंबीयांनी ताबडतोब वडूजला धाक घेत सरकारी दवाखाना गाठला. वास्तविक वडूज हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे तेथे सर्पदंशाचे उपचार मिळायला हवे होते. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी सर्पदंश झालेल्या मुलाला सातारला सिव्हिल रुग्णालयात नेण्यास सांगून जबाबदारी झटकली. 108 क्रमांकाला फोन केल्यानंतर उपलब्ध होणारी ऍम्ब्युलन्स त्याच दवाखान्याच्या दारात उभी होती. मात्र, त्याचा चालक गायब होता. त्यामुळे अथर्वला खासगी वाहनाने तातडीने सातारला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पण त्यातही अनास्थेची आडकाठी आली. ‘खासगी वाहनाने नेल्यास तेथे दाखल करून घेणार नाहीत. ही ऍम्ब्युलन्स असेल, तरच दाखल करून घेतील,’ असे त्यांना सांगण्यात आले. या घोळात जवळपास पाऊण तास निघून गेला. अखेर चालक आला; पण ‘डॉक्टर असल्याशिवाय मी घेऊन जाणार नाही,’ असे नवे कोडे त्याने घातल्यामुळे आणखी काही वेळ गेला. तेथून सातारला पोहोचण्यात आणखी तासभर गेला.

भीषण अपघात असो की प्राणघातक सर्पदंश असो, रुग्णाला कमीत कमी वेळेत उपचार मिळाल्यास त्याचा प्राण वाचू शकतो. त्या दृष्टीने घटनेनंतरचा ‘गोल्डन अवर’ अतिशय महत्त्वाचा असतो. मात्र, या घटनेत सरकारी आरोग्य यंत्रणेच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे आणि अनास्थेमुळे ‘गोल्डन अवर’ हातून निसटला. त्यामुळे सातारला क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयापर्यंत पोहोचेपर्यंत उपचारांअभावी तडफडून अथर्वचा मृत्यू झाला. या कोवळ्या निष्पाप बालकाचा हकनाक बळी गेला.

जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी अथर्वला तपासले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. अथर्कचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याचा जीव वाचविण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रचंड धावपळ केलेल्या जवळच्या माणसांचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. सरकारी आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेबद्दल त्यांनी यावेळी तीव्र संताप व्यक्त केला.