
इराण आणि इस्रायलमधील युद्ध आणि इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे होणारा परिणाम अधिकच तीव्र होत चालला आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील लोकांना अन्नटंचाईचा सामना करावा लागत आहे. खासकरून दुबईमध्ये हे संकट अधिक गडद झाले आहे.
दुबईमध्ये फक्त ८ ते १० दिवस पुरेल इतकाच अन्नसाठा आता शिल्लक राहिला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या इराणच्या निर्णयामुळे संपूर्ण प्रदेशातील शिपिंग लेन बंद झाले आहेत. यामुळेच आता व्यापार विस्कळीत झाला आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर सागरी मार्ग पूर्ववत झाला नाही तर, परिस्थिती आणखी बिकट होईल.
एनबीटीच्या अहवालानुसार, विश्लेषक शनाका अँस्लेम परेरा यांनी एक्सचे लॉजिस्टिक्स प्रमुख स्टीफन पॉल यांचे विधान शेअर केले. ५ मार्चला स्विस ब्रॉडकास्टर एसआरएफशी बोलताना पॉल म्हणाले की, दुबईमध्ये सध्या दहा दिवसांचा अन्नसाठा शिल्लक आहे. म्हणजेच शनिवार, ७ मार्चपर्यंत फक्त आठ दिवसांचे अन्न शिल्लक राहील. त्यांनी ही माहिती त्यांच्या कंपनीने देखरेख केलेल्या पुरवठा साखळी डेटावर आधारित केली आहे.
आखाती देश त्यांच्या अन्न आणि पेय गरजांपैकी ८०-९० टक्के इतर देशांकडून आयात करतात. आखाती सहकार्य परिषदेच्या ७० टक्के अन्न होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाते, हा एक महत्त्वाचा शिपिंग कॉरिडॉर आहे जो इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर इराणने बंद केला आहे. समुद्री मार्गांव्यतिरिक्त, इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या लढाईचा हवाई मालवाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
याउलट, युएई सरकार आणि अर्थ मंत्रालयाने जनतेला आश्वासन दिले आहे की देशात आवश्यक वस्तूंचा ४-६ महिन्यांचा धोरणात्मक साठा आहे. किरकोळ विक्रेत्यांनी पुरवठा राखण्यासाठी हिंदुस्थानसारख्या इतर देशांमधून ताजी फळे आणि भाज्या आयात करण्यासाठी चार्टर्ड कार्गो विमाने वापरणे सुरू केले आहे.





















































