बांधकाम कामगार कल्याण मंडळ, घोटाळय़ांच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱया वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील आर्थिक व्यवहारांची चौकशी एसआयटी मार्फत करावी अशी मागणी आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेत केली.

काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. बनावट कागदपत्रांचा वापर करून या मंडळातील योजनांचा लाभ घेतला जात असल्याचे वंजारी यांनी सांगितले. बांधकाम विभागाचे 37 हजार कोटींचे बजेट आहे. तरीसुद्धा तेथील अधिकारी सर्वसामान्यांना त्रास देतात असे आमदार भाई जगताप यांनी सांगितले.

मंत्री आकाश फुंडकर यांनी त्या प्रश्नाला उत्तर देताना आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्याचे मान्य केले. त्यांची पडताळणी विशेष मोहिमेद्वारे केली जात असून काही जिह्यांमध्ये तपासणी करून अनियमितता आढळलेल्या प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे फुंडकर यांनी सांगितले.

नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन असल्याने बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याची शक्यता तपासली जात असून दोषी अधिकारी किंवा व्यक्ती आढळल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे मंत्री फुंडकर यांनी सांगितले. त्यावर एसआयटीमार्फत चौकशी करा अशी मागणी सचिन अहिर यांनी केली.