
हरियाणाच्या हिसार शहरात पहिले अष्ट महालक्ष्मी मंदिर साकार होत आहे. या मंदिरातील देवीच्या सर्व प्रतिमा चांदीपासून तयार केल्या जातील. मागील चार वर्षांपासून मंदिराचे काम सुरू आहे. देशातील हे पहिले महालक्ष्मी मंदिर असेल जिथे आद्य महालक्ष्मीसोबत माता लक्ष्मीची आठ रूपे असतील.
हिसारच्या अग्रोहा शक्तिपीठाद्वारे अष्ट महालक्ष्मी मंदिर बांधण्यात येत आहे. 10 एकरांवर साकार होणाऱ्या मंदिरासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च होणार आहे. मंदिराची लांबी, रुंदी आणि उंची 108 फूट असेल. मंदिर उभारणीची जबाबदारी गुजरातचे आर्किटेक्ट सी. व्ही. सोमपुरा आणि आशिष सोमपुरा यांच्यावर आहे. त्यांनी उत्तर प्रदेशच्या राममंदिर उभारणीत महत्त्वाची भूमिका साकारली होती.
- मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला चार मुख्य द्वार असतील. मंदिराच्या बांधकामात कुठेही लोखंडी सळ्यांचा वापर केलेला नाही. मंदिराच्या मध्यभागी 75 फुटांचा हॉल आहे.
- मंदिराच्या गर्भगृहात माता लक्ष्मीची मुख्य प्रतिमा असेल. प्रतिमा 108 किलो चांदीपासून तयार केलेली असेल. लक्ष्मीमातेचे सिंहासन 108 किलो वजनी असेल. मंदिराच्या बांधकामात बन्सी पहाडपूर दगडांचा वापर करण्यात येईल.
- अनोखी शिल्पकला आणि पारंपरिक वास्तुकलेचा संगम असलेले मंदिर येत्या काळात भाविकांसाठी श्रद्धा आणि आकर्षणचा केंद्रबिंदू ठरेल.