राहुरी तालुक्यातील राहुरी-मांजरी शिव हद्दी दरम्यान एका उसाच्या शेतामध्ये 67 वर्षीय वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुमन सावळेरराम विटनोर असे या मृत महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अमित राठोड, दीपक फुंदे घटनास्थळी दाखल झाले आहेत. श्वान पथक, ठसे तज्ज्ञ अन् फॉरेन्सिक क्लबचे पथकही लवकरच घटनास्थळी दाखल होईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी येथील शिक्षक कैलास विटनोर, विलास विटनोर, भगवान यांच्या मातोश्री रविवारी दुपारच्या दरम्यान शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या. माञ त्या उशिरापर्यंत घरी न गेल्याने सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता आज दुपारच्या दरम्यान चोपडे यांच्या उसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे.
मृतदेहाच्या अंगावरील सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने लुटण्यात आले आहेत. मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी चेहरा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरुन चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस सखोल तपास करत आहेत. तपासानंतरच सत्य समोर येईल.