हिंदुस्थानी लष्कराचा गणवेश बदलणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी लष्कराचा गणवेश अधिक सुविधापूर्ण आणि सुंदर करण्याचा विचार संरक्षण खाते करीत आहे. त्यामुळे हिंदुस्थानी लष्कराचा गणवेश बदलण्याची शक्यता आहे. संरक्षण विभागाने वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून नवीन गणवेशासंदर्भात सूचना मागविल्या आहेत. लष्करी जवानाचा गणवेश आकर्षक, आरामदायी  आणि सुविधापूरक असावा, अशी कल्पना आहे.

देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या हिंदुस्थानी लष्कराचा गणवेश अधिक आरामदायी असावा, असा विचार संरक्षण विभागाचा आहे. लष्कराचा गणवेश बदलताना जगभरातील अन्य देशांच्या सैन्याचे गणवेश विचारात घेण्यात येत आहेत. अमेरिका आणि ब्रिटनच्या गणवेशामध्ये पुरस्काराचे बिल्ले छातीवर लावले जातात. हिंदुस्थानात बिल्ले खांद्यावर लावले जातात. नव्या गणवेशात असे बदल करण्याचा विचार केला जात आहे.

असे आहेत युनिफॉर्म

हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांकडे सध्या चार प्रकारचे गणवेश असतात. कॉम्बॅट युनिफॉर्म (युद्धभूमीवरील गणवेश), पीस युनिफॉर्म (शांतताकाळातील गणवेश), मेस युनिफॉर्म (जेवणाकरिता गणवेश) आणि सेरिमोनियल युनिफॉर्म (समारंभाचा गणवेश) असे त्याचे प्रकार आहेत. हे गणवेशांचे सर्व प्रकार बदलले जाण्याची शक्यता आहे.

गणवेशबदलाच्या सूचना

  • लष्कराच्या नव्या गणवेशात शर्ट आणि पँट दोन वेगवेगळ्या रंगांच्या करता येतील का, याबाबतही विचारविनिमय सुरू आहे.
  • युद्धभूमीवरील गणवेशातील पट्टय़ांची रुंदी वाढवावी, अशी एक सूचना करण्यात आली आहे.
  • सैन्याचा गणवेश बदलणे ही तातडीने होणारी गोष्ट नाही. लाखो सैनिकांचा गणवेश एका दिवसात बदलणे शक्य नाही. ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे.
  • गणवेशाबद्दल अनेक स्तरांवर सविस्तर चर्चा झाल्यावर नवीन गणवेशाचे डिझाइन निश्चित करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
  • यापूर्वी अनेकवेळा हिंदुस्थानी लष्कराच्या गणवेशात काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. मात्र, गणवेशामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा प्रथमच विचार केला जात आहे.