पालिकेच्या वैधानिक समित्यांच्या अध्यक्ष पदांची निवडणूक बिनविरोध; स्थायीसाठी प्रभाकर शिंदे तर शिक्षणसाठी राजेश्री शिरवडकर यांचे एकमेव अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या वैधानिक समिती अध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी आज भाजपचे प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समितीसाठी भाजपच्या राजेश्री शिरवडकर यांनी आज पालिका चिटणीस मंजिरी देशपांडे यांच्याकडे अर्ज सादर केले. 20 फेब्रुवारीला ही निवडणूक होणार आहे.

मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे वैधानिक समितींच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. मात्र स्थायी आणि शिक्षण समितीसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यानंतर सुधार समिती अध्यक्ष पदासाठी शिंदे गटाच्या संध्या दोशी यांनी तर बेस्ट समिती अध्यक्ष पदासाठी शिंदे गटाच्या तृष्णा विश्वासराव यांनी अर्ज दाखल केला. सुधार आणि शिक्षण समिती अध्यक्ष पदाची निवडणूक 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

समित्यांमध्ये शिवसेनेचा आवाज घुमणार
वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदी शिवसेनेचा उमेदवार नसला तरी स्थायी समितीत शिवसेनेच्या नगरसेविका श्रद्धा जाधव, नगरसेवक यशोधर फणसे, रमाकांत रहाटे, दीपमाला बढे, मीनाक्षी पाटणकर, टी. जगदीश आणि लक्ष्मी भाटिया सदस्य पदी आहेत. तर ‘बेस्ट’ समितीमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका प्रवीणा मोरजकर, नगरसेवक सचिन पाटील, नितीन नांदगावकर, मोहन अहीर आणि सुनील मोरे सदस्यपदी असतील.

सुधार समितीसाठी शिवसेना नगरसेविका विशाखा राऊत, नगरसेवक मिलिंद वैद्य, नगरसेवक सचिन पडवळ, उर्मिला पांचाळ, जितेंद्र वळवी, विठ्ठल लोकरे आणि लोना रावत सदस्यपदी आहेत, तर शिक्षण समितीमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका चित्रा सांगळे, नगरसेवक प्रमोद सावंत, पूजा महाडेश्वर, गीता भंडारी, अंकित प्रभू आणि सोनाली साबे सदस्यपदी असतील. त्यामुळे मुंबईचा विकास आणि सुविधांसाठी सत्ताधाऱयांवर नजर ठेवून अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे काम शिवसेनेचे शिलेदार करणार आहेत.

पालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या पाहता वैधानिक समिती अध्यक्षपदी उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने आम्ही अर्ज दाखल केला नाही. मात्र समित्यांमधील आमचे सदस्य सत्ताधाऱयांवर नक्कीच नजर ठेवून मुंबईच्या विकासासाठी काम करतील.
किशोरी पेडणेकर,विरोधी पक्षनेत्या