चिपळुणात पूर ओसरू लागला, मदतकार्य वेगात; 1231 लोकांची सुटका

चिपळुणात आलेला महापूर आता ओसरू लागला आहे. पुरामुळे जबर नुकसान झाले आहे. मदतकार्य वेगात सुरू आहे. एनडीआरएफ, तटरक्षक दल, नगरपालिकेसह स्थानिक मच्छीमार आणि विविध संस्थांचे कार्यकर्ते मदतकार्यात सहभागी झाले आहेत. महापुरात अडकलेल्या 1231 लोकांची आज सायंकाळपर्यंत सुखरूप सुटका करण्यात यश आले. अतिवृष्टी सुरूच असून खेडमधील पोसरे बौद्धवाडी येथे दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला, तर 17 जण ढिगाऱयाखाली अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येऊन गुरुवारी चिपळूण शहरातील बहुतांश भाग पाण्याखाली गेला होता. गुरुवारी सायंकाळपासून मदतकार्य हाती घेण्यात आले. एनडीआरएफची पथके पोहोचण्यापूर्वी तटरक्षक दल आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱयांसह स्थानिक मच्छीमार, रत्नदुर्ग माऊंटेनियर्स, राजू काकडे हेल्प फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी मदतकार्य हाती घेतले होते. पुराचे पाणी आज सकाळपासून ओसरायला सुरुवात झाली; परंतु मुसळधार पाऊस सुरूच असल्याने पाणी ओसरण्याचा वेग कमी आहे.

पिण्याच्या पाण्याचे टँकर अडकले

चिपळूणमध्ये आता पिण्याचे पाणी आणि अन्नाची गरज आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर मागवण्यात आले होते; परंतु ते रत्नागिरीच्या दिशेने येत असताना कोल्हापुरातील निळे येथे पुरामुळे अडकून पडले आहेत. तरीही उपलब्ध होईल तसे पिण्याचे पाणी, फरसाण, मेणबत्त्या आणि कपडे यांची मदत दिली जात आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

कोरोना सेंटरमधील 8 रुग्णांचा पुरात मृत्यू

चिपळूणातील अपरांत रुग्णालयात कोरोना सेंटर आहे. महापुराचे पाणी शिरल्याने सेंटरचा तळमजला बुडाला होता. व्हेंटिलेटर्समध्ये पाणी शिरल्याने या सेंटरमधील 8 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांना वाचवण्यासाठी एक बोट गेली होती; परंतु ती  पाण्याच्या प्रवाहामुळे पलटी झाली. बोटीतील दोन जण वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

खेडच्या बिरमणीत दरड कोसळून दोघांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत. खेडमधील बिरमणी गावातील मोरेवाडीत दरड कोसळल्यामुळे एकाच कुटुंबातील दोन जण गाडले गेले. ढिगाऱयाखाली सापडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बिरमणी आणि पोसरे येथे एनडीआरएफ पोहचले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या