
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे गट व अजित पवार गट यांच्यात कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. भाजपने युतीचा प्रस्ताव देऊनही अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी परस्पर आपले पाच उमेदवार जाहीर केले. अशाच पद्धतीने कर्जत-खालापूर तसेच महाड-पोलादपूर विधानसभा मतदारसंघासह अन्य ठिकाणीदेखील शिंदे गटाने भाजपला व अजित पवार गटालाही न जुमानता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली असून भाजप व अजित पवार गटानेही शिंदे गटाला कात्रजचा घाट दाखवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा असून स्वतंत्र लढण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी व १५ पंचायत समितींच्या ११८ जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. मात्र राज्यात मांडीला मांडी लावून बसलेल्या भाजप-शिंदे व अजित पवार गटाने नगर परिषदा, नगरपंचायत निवडणुका स्वतंत्र लढल्या.
रायगडात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही महायुतीत जागावाटपावरून सुरूंग लागला आहे. भाजपचे दक्षिण रायगड निवडणूक प्रमुख सतीश धारप यांनी जागावाटपासंदर्भातला प्रस्ताव शिंदे गट व अजित पवार गटाला
दिला होता, परंतु अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील पाच उमेदवारांची नावे परस्पर जाहीर करून एकप्रकारे भाजपचा प्रस्तावच धुडकावून लावला आहे.
महाड, कर्जत विधानसभा मतदारसंघातही मंत्री भरत गोगावले व आमदार महेंद्र थोरवे यांचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांच्याबरोबर राजकीय हाडवैर असल्याने या दोन विधानसभा मतदारसंघातही महायुतीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत.
स्वबळावर लढूः भाजपने खडसावले
जागावाटपासंदर्भातील प्रस्ताव भाजपने दिला आहे. शिदि गटाने उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरपर्यंत चर्चा सुरू राहील. मात्र अपेक्षित जागा न मिळाल्यास आम्ही स्वबळावर लढू अशा शब्दात भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्षा चित्रा पाटील यांनी खडसावले आहे.
…तर आम्हीही कात्रजचा घाट दाखवू !
शिंदे गट अलिबाग, कर्जत व महाड विधानसभा क्षेत्रात अजित पवार गट व भाजपला फारसे जुमानत नसल्याने या पक्षाच्या कार्यकत्यांमध्ये खदखद आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिंदे गटाने परस्पर उमेदवार उभे करून निवडणूक लढल्यास भाजप, अजित पवार गट तसेच स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या आघाड्या करून शिंदे गटाला कात्रजचा घाट दाखवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशा या तीन पक्षातील कलगीतुरा अधिकच रंगणार आहे.


























































