डोंबिवलीतील शिवमंदिर मुक्तिधाम स्मशानभूमीचे छत फुटले आहे. गळतीमुळे छत्र्या हाती घेऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे वृत्त ‘सामना’ मधून प्रसिद्ध होताच केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले. आज पालिका प्रशासनाने शिवमंदिरसह नऊ स्मशानभूमींचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. यासाठी 20 कोटींचा निधी मंजूर केला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कल्याण विभागात २६ तसेच डोंबिवली विभागात 39 अशा 65 स्मशानभूमी आहेत. पैकी बऱ्याच स्मशानभूमींची पडझड झाली आहे. डोंबिवलीतील शिवमंदिर मुक्तिधाम स्मशानभूमीच्या छताला भगदाड पडले आहे. गळतीमुळे लाकडे भिजत असून अक्षरशः छत्र्या हाती घेऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्यातच स्मशानभूमीत पावसामुळे पडलेले खड्डेही बुजवले नाहीत. कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दुर्गंधीमुळे नाक मुठीत घेऊन अंत्यसंस्कार विधी पार पाडावे लागत असल्याकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रसारक आणि गरीबाचा वाडा विभागप्रमुख प्रमोद कांबळे यांनी लक्ष वेधले होते. याबाबतचे वृत्त ‘सामना’तून आज प्रसिद्ध होताच आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी शहरातील सर्व स्मशानभूमींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
अद्ययावत सुविधा
कल्याण विभागातील आधारवाडी, बैलबाजार, प्रेम ऑटो, विठ्ठलवाडी, टिटवाळा तसेच डोंबिवली विभागातील शिवमंदिर, पाथर्ली, कोळेगाव तसेच हेदुटणेपाडा या स्मशानभूमींसाठी 20 कोटी मंजूर केले आहेत. या सर्व स्मशानभूमींमध्ये अद्ययावत आरसीसी स्ट्रक्चर, लाकडे ठेवण्यासाठी स्टोअर रूम, अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी आसनव्यवस्था करणे, शौचालयाचे बांधकाम नव्याने केले जाणार आहे.