कर्नाटकातील संकेश्वर येथील साखर कारखान्याचे मळीमिश्रित पाणी व संकेश्वर नगरपालिकेचे ड्रेनेजचे सांडपाणी हिरण्यकेशी नदीत मिसळत असल्याने गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर पंचक्रोशीतील नांगनूरसह खणदाळ, अरळगुंडी, कडलगे, इदरगुच्ची या पाच गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रश्नी कर्नाटकातील संकेश्वर साखर कारखाना, संकेश्वर नगरपालिकेवर कारवाई करण्यात यावी व तातडीने या समस्येवर उपाययोजना करावी अन्यथा 20 जून रोजी गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा हिरण्यकेशी व नांगनूर पंचक्रोशी पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
या संदर्भातील निवेदन माजी सभापती अमरसिंह चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, संकेश्वर येथील साखर कारखान्याचे मळीमिश्रित पाणी आणि संकेश्वर नगरपालिकेचे सांडपाणी व ड्रेनेजचे पाणी 2009 पासून हिरण्यकेशी नदीत सोडले जात आहे. यामुळे नदीचे पाणी वारंवार दूषित होत असून, यामुळे मानवी आरोग्याबरोबरच पशुपक्षी यांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे. त्याचबरोबर शेतजमिनीचेही नुकसान होत आहे. याबाबत गेली अनेक वर्षे नांगनूर, अरळगुंडी, कडलगे, खणदाळ, इदरगुच्ची या गावांतील नागरिक संकेश्वर कारखाना व नगरपालिका यांना पत्रव्यवहार करत आहेत. मात्र, या दोन्ही संस्थांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. या विरोधात नांगनूर येथील शाहू मोकाशी यांनी मानवी हक्क आयोगाकडे तक्रारदेखील नोंद केली होती.
याबाबत सुनावणी होऊन 2022 साली आयोगाने कारवाईचे थेट निर्देश दिले होते. आदेशाच्या तारखेपासून दोन महिन्यांत कारवाई झाली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश असतानादेखील कर्नाटक पोल्युशन बोर्डाने काहीही कारवाई केलेली नाही. संकेश्वर साखर कारखान्याला या प्रश्नावरून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, 26 जानेवारी 2024 रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पाण्याचे नमुने तपासून हे पाणी रसायनमिश्रित असल्याचे सांगितले आहे. संकेश्वर कारखाना व नगरपालिकेमुळे पाच गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मळीमिश्रित या पाण्यामुळे इथल्या पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजातींसह जलचर प्राणीदेखील नष्ट झाले आहेत. त्यामुळे संकेश्वर साखर कारखाना व नगरपालिकेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केले आहे. कारवाई झाली नाही, तर 20 जून रोजी या पाचही गावांतील ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
निवेदनावर अमरसिंह चव्हाण, अमृत शिंत्रे, बाळगोंडा पाटील, शाहू मोकाशी, वसंत नाईक, सुरेंद्र देशपांडे, सुजित देसाई, शिवानंद मोरबाळे, राजेंद्र करीगार, सिद्राम आमाते, शिवाजीराव माने, राजू बंदाई, लक्ष्मण नवलगुंदे, मयोदीन मुल्ला, युवराज राऊत, शंकर केसरोळी, रशीद मुल्ला, विजय जाधव, सचिन नाईक आदींच्या सह्या आहेत.