नवरात्रीत आवाज वाढल्यास त्याची तक्रार करण्यासाठी ठाणेकरांना खास टोल फ्री क्रमांक देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे यंदा ठाणेकरांचा गरबा आवाजाच्या मर्यादेत साजरा होईल. महत्त्वाचे म्हणजे उत्सवात वापरल्या जाणाऱ्या लेझर लाईटचा नाहक त्रास नागरिकांना होतो. त्यावरही निर्बंध आणा, असेही न्यायालयाने पोलिसांना सांगितले आहे.
न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. उत्सवातील आवाजाला प्रतिबंध करण्यासाठी न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार मोठ्या आवाजाची तक्रार करण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक तयार करावा, असेही न्यायालयाने सांगितले होते. ठाण्यात उत्सवासाठी जारी करण्यात आलेल्या नियमावलीत टोल फ्री क्रमांक नमूद नाही, ही बाब खंडपीठाच्या निदर्शनास आली. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने आजच नवीन परिपत्रक जारी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. नवीन परिपत्रक जारी करा. त्यामध्ये टोल फ्री क्रमांकाचा स्पष्ट उल्लेख करा. या टोल फ्री क्रमांकाला रेल्वे, बस स्थानक व सार्वजनिक ठिकाणी ठळक प्रसिद्धी द्या. जेणेकरून लोकांना कळेल की मोठ्या आवाजाची तक्रार कुठे करायची, असे खंडपीठाने आदेशात नमूद केले. हे परिपत्रक जारी केले जाईल, अशी हमी सरकारी वकील विठ्ठल कोंडे-देशमुख यांनी दिली.
जनजागृती करा
उत्सवांमध्ये आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होणार नाही यासाठी जनजागृती करा. मंडळांना उत्सवासाठी परवानगी देताना डेसिबलच्या मर्यादेचे पालन करण्याची सक्ती करा. जेणेकरून लोकांना याचा त्रास होणार नाही, असेही न्यायालयाने पोलिसांना सांगितले.