
इचलकरंजी येथील महानगरपालिकेच्या गटनेतेपदी भाजपने विठ्ठल पुंडलिक चोपडे यांची, तर शिवशाहू आघाडीने उदयसिंग मारुती पाटील यांची निवड केली आहे. दरम्यान, येत्या 9 फेब्रुवारी रोजी महापौरपदाची निवडणूक घोषित झाली आहे.
इचलकरंजी महानगरपालिकेची 16 जानेवारीला पहिली निवडणूक झाली. भाजपने 65 पैकी 43 जागा जिंकल्या आणि गटनेतेपदी भाजपमध्ये नव्याने सामील झालेल्या विठ्ठल चोपडे यांना उमेदवारी दिली. आता मनपा गटनेतेपद दिले आहे. यापूर्वी ते राष्ट्रवादी अजित पवार गटात होते, तर विरोधी मविआ प्रणित शिवशाहू आघाडीने माजी उपनगराध्यक्ष उदयसिंग पाटील या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष नेत्याची गटनेता अशी निवड केली आहे. या शिवशाहू आघाडीचे मनपात 17 जण निवडून आले आहेत. यात राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस आणि स्थानिक आघाडीचे नगरसेवक यांचा समावेश आहे. पालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे एकजण आहेत. महायुतीमधील शिंदे गटाचे तिघे, तर अजित पवार गटाचा एक नगरसेवक आहे.
येत्या 9 फेब्रुवारी रोजी महापौरपदाची निवडणूक घोषित झाली आहे. नागरिकांचा मागास वर्ग यासाठी आरक्षण असून, भाजपने दहा महिन्यांसाठी एक महापौर अशी अडीच वर्षांत तीन जणांना संधी देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या सभागृहात 65 पैकी 34 महिला, तर 31 पुरुष विजयी झाले आहेत.
























































