म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवासी, भाडेकरूंचे सुरू असलेले बायोमेट्रिक सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत म्हाडातर्फे सुमारे 18 हजार रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात आले असून लवकरच उर्वरित दीड ते दोन हजार रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात येईल, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. बायोमेट्रिक सर्वेक्षणामुळे म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील घुसखोरांची ओळख पटणार आहे.
संक्रमण शिबिरातील वाढती घुसखोरी हा म्हाडासाठी चिंतेचा विषय आहे. म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील भाडेकरूंचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्यांच्या वास्तव्याची प्रमाणता निश्चिती करण्याची जबाबदारी राज्य शासनाने म्हाडाकडे सोपविली आहे. संक्रमण शिबिरातील भाडेकरूंची आधार कार्डमध्ये नोंद असलेली माहिती तसेच ई-केवायसी अधिप्रमाणन सुविधेचा वापर करून बायोमेट्रिक सर्वेक्षणाच्या आधारे मंडळातर्फे पडताळणी करण्यात येत आहे. या आधारे संक्रमण शिबिरातील भाडेकरूंच्या वास्तव्याची प्रमाणता अधिकृत किंवा अनधिकृत असल्याची निश्चिती करण्यात येणार आहे.
बायोमेट्रिक सर्वेक्षणानंतर ‘अ’, ‘ब’, ‘क’ असे प्रवर्ग करण्यात येणार आहेत. ‘अ’ प्रवर्गात मूळ रहिवासी ज्यांना संक्रमण शिबिरात गाळा दिला आहे. ‘ब’ प्रवर्गात असे रहिवासी ज्यांनी मूळ रहिवाशांकडून संक्रमण शिबिरातील गाळय़ाचा हक्क घेतला आहे तसेच ‘क’ प्रवर्गात घुसखोर रहिवासी ज्यांनी म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळय़ांचा अनधिकृतपणे ताबा घेतला. यानुसार मंडळातर्फे सर्वेक्षणाची कार्यवाही सुरू आहे.