निमित्त – व्यंगचित्रांची भाषा

>> संजय मिस्त्री

जगात अनेक कला आहेत. त्यामध्ये चित्रातून भाष्य करणारी व्यंगचित्रकला ही एक आहे. प्राचीन काळी भाषा तयार होण्यापूर्वी चित्र हीच संवादाची भाषा होती. त्यातूनच गंमत म्हणून गमतीदार चित्रे काहीजण रेखाटू लागले. त्यातूनच व्यंगचित्र हे प्रभावी माध्यम तयार झाले. 5 मे रोजी जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे, त्यानिमित्ताने हा लेख.

पूर्वी लोक पपायरस नावाच्या वनस्पतीच्या पानावर लिहीत असत. नंतर पेपरचा शोध लागला आणि ‘पपायरस’वरूनच पेपर हा शब्द आला. काही वर्षांनंतर छपाईचा शोध लागला. वर्तमानपत्रे, नियतकालिके निघू लागली आणि लिहिलेले लेख वाचनीय व्हावेत म्हणून चित्रकार, व्यंगचित्रकार यांची गरज भासू लागली. प्रत्येक वर्तमानपत्राला आपल्याकडे व्यंगचित्रकार असावा असे वाटू लागले. चालू असलेली राजकीय, सामाजिक परिस्थिती सोपी करून सांगण्यासाठी संपादकांना व्यंगचित्रकारांची गरज भासू लागली. त्यातून जगभर व्यंगचित्रकार हा व्यवसाय हळूहळू तयार होऊ लागला. अनेक चांगले चित्रकार व्यंगचित्रकार म्हणून काम करू लागले.

व्यंगचित्रकलेत अनेक प्रकार आहेत. हास्यचित्रे, कॉमिक्स, राजकीय व्यंगचित्रे, अर्कचित्रे, कॅरिकेचर इत्यादी. परत त्यामध्ये रंगीत आणि ब्लॅक अँड व्हाइट हा प्रकार आहे.

जगभरात वर्तमानपत्रे आजच्या सोशल मीडियासारखी लोकांच्या मनावर राज्य करत होती. संपादक, विद्वान लोकांचे लेख वाचणे, व्यंगचित्रे पाहणे ही त्या काळी मेजवानी असे. वातावरण वैचारिक चळवळीला अनुकूल होते. त्या काळातच जगातील पहिले राजकीय व्यंगचित्रकार तयार झाले. विल्यम होगार्थ आणि जेम्स गिलरी. या दोघांनी जबरदस्त व्यंगचित्रे रेखाटून युरोपमधील लोकांना व्यंगचित्रकलेची आवड निर्माण केली. एवढी की, त्यातून फक्त व्यंगचित्रे हा विषय असणारी नियतकालिके निघाली. त्यामध्ये ‘पंच’, ‘मॅड‘, ‘न्यूयॉर्कर’ अशा काही इंग्लंड, अमेरिकेतील व्यंगचित्र नियतकालिकांचा उल्लेख करावा लागेल. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी काही व्यंगचित्रकार कार्यरत होते. त्यामध्ये केरळच्या शंकर पिल्लई यांचा उल्लेख करावा लागेल. पंडित नेहरू यांच्याशी त्यांची खास मैत्री होती तरीही त्यांनी पंडित नेहरू यांच्यावर असंख्य व्यंगचित्रे काढली. एवढेच नाही तर त्यांचे पंडित नेहरू यांच्यावर टीका करणाऱया व्यंगचित्रांचे पुस्तकही निघाले. त्या पुस्तकाला प्रस्तावना पंडित नेहरू यांनी लिहिली. त्या प्रस्तावनेत पंडित नेहरू म्हणतात, “काम करताना चुकलो तर व्यंगचित्रकारांनी मलाही सोडू नये. डू नॉट स्पेअर मी.’’

याच शंकर पिल्लई यांनी पूर्णपणे व्यंगचित्रे असणारे ‘पंच’सारखे स्वतचे नियतकालिक चालू केले. त्याचे नाव ‘शंकर्स विकली’! देशातील अनेक व्यंगचित्रकार या साप्ताहिकाने तयार केले, घडविले. तसाच प्रयोग महाराष्ट्रात ‘फ्री प्रेस जर्नल’ आणि ‘असाही शिंबून’सारख्या प्रचंड खपाच्या जपानी दैनिकात व्यंगचित्रे काढणाऱया एका व्यंगचित्रकाराने केला. त्या लोकप्रिय व्यंगचित्रकाराचे नाव माननीय बाळासाहेब ठाकरे.

‘मार्मिक’ सुरू झाल्यापासून त्या व्यंगचित्र साप्ताहिकाने जनतेला व्यंगचित्रकलेचे वेड लावले. उच्च दर्जाची प्रतिभा असल्यामुळे मा. बाळासाहेब यांच्या व्यंगचित्रांना सगळ्या थरांतून लोकप्रियता मिळाली. मा. बाळासाहेब यांनी याच ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिकामुळे शिवसेना हा जगप्रसिद्ध राजकीय पक्ष काढला. व्यंगचित्रकार असल्यामुळे जागतिक, देशातील, राज्यातील राजकारणाचा अभ्यास असल्यामुळे हा पक्ष झपाटय़ाने प्रगतिपथावर राहिला.

मराठी माणसांच्या भल्याचा विचार करता करता मा. बाळासाहेबांनी अनेक होतकरू व्यंगचित्रकारांना ‘मार्मिक’मधून संधी दिली. एवढेच नव्हे, तर या व्यंगचित्रकारांनी एकत्र यावे म्हणून साऱया व्यंगचित्रकारांना बोलावले आणि 1983 साली शिवसेना भवन येथे मराठी व्यंगचित्रकारांची संस्था स्थापन केली. त्याचे नाव कार्टुनिस्ट्स कंबाईन! या संस्थेच्या स्थापनेच्या दिवशी शिवसेना भवन येथे हजर असणाऱया अनेक व्यंगचित्रकारांपैकी आजही काही व्यंगचित्रकार काम करत आहेत. प्रभाकर वाईरकर, संजय मिस्त्राr, यशवंत सरदेसाई, खलील खान, विवेक मेहेत्रे, सुरेश क्षीरसागर हे त्या वेळी उपस्थित असणारे व्यंगचित्रकार आजही वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतून त्याच उमेदीने काम करताना दिसतात.

या कार्टुनिस्ट्स कंबाईन संस्थेतर्फे दरवर्षी भव्य व्यंगचित्रकार संमेलन भरविले जाते. संमेलन मुंबईत असो वा पुण्यात मा. बाळासाहेब आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहत  असत. या वर्षी हे संमेलन सांताक्रूझ येथील ओला वाकोला हॉलमध्ये दिनांक 5 आणि 6 मे रोजी भरविण्यात येणार आहे. या संमेलनाचे आयोजन कार्टुनिस्ट्स कंबाईनचे विद्यमान अध्यक्ष संजय मिस्त्राr व ओला वाकोलाचे संदेश चव्हाण यांनी एकत्र येऊन केले आहे.

या संमेलनाचे उद्घाटन 5 मे रोजी सकाळी दहा वाजता होईल. या संमेलनाचे वैशिष्टय़ म्हणजे व्यंगचित्रकलाविषयक शैक्षणिक आणि तरीही मनोरंजक व्याख्याने होणार आहेत. आपापल्या क्षेत्रात माहीर असलेल्या व्यक्ती यावेळी व्याख्याने देणार आहेत. त्यामध्ये पॉकेट कार्टूनविषयी प्रशांत कुलकर्णी, हास्यचित्राविषयी संजय मिस्त्राr, अर्कचित्राविषयी प्रभाकर वाईरकर, कॉमिक्सविषयी ‘चिंटू’फेम चारुहास पंडित असे अनेक नामवंत व्यंगचित्रकार प्रत्यक्षिकासह व्यंगचित्रकलेची ओळख करून देणार आहेत. डिजिटल व्यंगचित्रकला व एआय अशा विविध विषयांवर जाणकार व्यंगचित्रकार प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. आलेल्या रसिक प्रेक्षकांना स्वतचे कार्टून, अर्कचित्रे काढून घेण्याची संधी या संमेलनात मिळणार आहे. मा. बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेल्या या रोपटय़ाचा वृक्ष झाला आहे. चला, तर मग या कडक उन्हाळ्यात त्या व्यंगचित्र वृक्षाच्या सावलीत काही क्षण घालवूया.

sanjay.mistry555@gmail. com