
राज्यात महापालिका निवडणुकांची मतमोजणी सर्व प्रभागांत एकाच वेळी सुरू करायची किंवा प्रत्येक प्रभागनिहाय करायची याचा निर्णय संबंधित महापालिकांच्या आयुक्तांवर सोपवण्यात आला आहे. मात्र मुंबईत एकाच वेळी मतमोजणी करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. दरम्यान 16 जानेवारीला दुपारी 4 वाजेपर्यंत राज्यातल्या सर्व महापालिकांचे चित्र स्पष्ट होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
यापूर्वी निवडणूक मतमोजणी एकाच वेळी हाती घेतली जात होती. मात्र काही महापालिका आयुक्तांनी प्रभागनिहाय मतमोजणी हाती घेतल्यास ते प्रशासकीयदृष्टय़ा सोपे होईल, अशी भूमिका घेतली आहे. मतमोजणीबाबत राज्य निवडणूक आयोगाचे स्थायी आदेश आहेत. त्यानुसार आयुक्तांनी संबंधित पोलीस आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. कायदा आणि सुव्यवस्था, कर्मचाऱयांची उपलब्धता यावर हा निर्णय अवलंबून आहे. मुंबईच्या संदर्भात आयुक्तांनी सुरुवातीला प्रभागनिहाय मतमोजणी घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ते उमेदवारांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. 16 जानेवारीला सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. त्यामुळे दुपारी 4 वाजेपर्यंत महापालिका निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होईल असे वाघमारे यांनी स्पष्ट केले.





























































