मानखुर्दमधील मेट्रो बांधकामाजवळ प्लास्टिक बॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या हत्येचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. महिलेच्या पती आणि प्रियकरानेच संगनमताने महिलेची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये महिलेचा पती, दीर, प्रियकर, प्रियकराची आई आणि बहिण यांचा समावेश आहे.
रेश्मा जैस्वाल असे मयत महिलेचे नाव आहे. तर पती कन्हैयालाल जैस्वाल, दीर अशोक जैस्वाल, प्रियकर रवी श्रीवास्तव, मुन्नी श्रीवास्तव आणि रेश्मा श्रीवास्तव अशी आरोपींची नावे आहेत. सर्वजण मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरमधील रहिवासी आहेत.
रेश्मा जैस्वाल हिचे आरोपी रवी श्रीवास्तव याच्याशी अनैतिक संबंध होते. पत्नीला सोडून आपल्याशी विवाह करण्यासाठी रेश्मा वारंवार रवीवर दबाव आणत होती. तसे न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या दबावाला कंटाळून अखेर रवी आणि रेश्माचा पती कन्हैयालाल यांनी तिचा काटा काढण्याचा कट रचला. या हत्येत रेश्माचा दीर अशोक, रवीची आई आणि बहीण यांनीही मदत केली.
पती आणि दिराने रेश्माचे हात-पाय धरले. रवीने तिच्या डोक्यात दगड घातला. यानंतर तीन दिवस मृतदेह रवीच्या घरातच ठेवला आणि 24 ऑगस्ट रोजी मानखुर्दमधील मेट्रो कारशेडजवळ मृतदेह फेकून दिला. यानंतर सर्व प्रकरण उघडकीस आले.