
पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एका आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आरोपी अर्जदाराविरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस अपयशी ठरले असे निरीक्षण नोंदवत जन्मठेप सुनावलेल्या आरोपीची हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.
कुर्ल्यातील इमारतीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने अर्जदारावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत अर्जदाराविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरोधात आरोपीने हायकोर्टात ऍड. तपन थत्ते व ऍड. विवेक आरोटे यांच्यामार्फत अपील दाखल केले. या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
जबानीत विसंगती
त्यावेळी उच्च न्यायालयाने पीडितेच्या जबानीतील विसंगती, वैद्यकीय पुराव्याचा अभाव आणि दोन कुटुंबांमधील वैमनस्य लक्षात घेता, पोक्सो कायद्यांतर्गत 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या अर्जदाराची निर्दोष मुक्तता केली. तसेच विशेष न्यायालयाने दिलेला निकाल रद्दबातल करत न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी आरोपीला तत्काळ कारागृहातून सोडण्याचे आदेश दिले.

























































