The Rain Man – तो जिथे जायचा तिथे पाऊस सुरू व्हायचा

पृथ्वीतलावर अनेकदा काही अशा घटना घडतात ज्यामुळे सर्वच अचंबित होतात. या सोबतच अशा घटनांचे रहस्य देखील कधी उघड होत नाही. अशीच एक रहस्यमय घटना अमेरिकेच्या पेन्सिलवेनियाभागात राहणाऱ्या डोनाल्ड उर्फ डॉन डेकर सोबत घडली. डॉन डेकर जिथं जायचा तिथं अचानक पाऊस सुरू व्हायचा. यामुळे त्यांना ‘The Rain Man’ हे नावही मिळाले. डॉन डेकरसोबत घडलेल्या या घटनांवरील पडदा आजही कोणी उठवू शकलेला नाही.

डॉन डेकर 21 वर्षांचा असताना 1983 मध्ये ही घटना घडली. एक चोरीच्या प्रकरणात तो तुरुंगात शिक्षा भोगत असताना फेब्रुवारी महिन्यात त्याच्या आजोबांचे निधन होते. आजोबांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी डॉन डेकर याला काही अटी-शर्तीसह परवानगी देण्यात आली. ‘7 वर्षांचा असताना आजोबा माझे लैंगिक शोषण करत होते’, असा दावा डॉन याने केला होता. मात्र तरीही तो त्यांच्या अंत्यसंस्कार विधीला हजर राहिला आणि त्या नंतर एका मित्राच्या घरी थांबला.

डॉनचा मित्र एका भाड्याच्या खोलीत राहायचा. त्याच्यासोबत त्याचे काही मित्र देखील होते. सर्व लोक हॉलमध्ये एकत्र बसले असताना अचानक घराच्या छतातून पाण्याचे थेंब पडू लागले. छताची व्यवस्थित पाहणी केली असता पाणी तिथपर्यंत पोहोचण्याचा कोणताही स्रोत दिसून आला नाही. डॉन जिथे बसला होता तिथेच हे पाण्याचे थेंब पडत असल्याने सर्वच हैराण झाले.

याच वेळी डॉन याला विचित्र त्रास सुरू झाला. त्यामुळे त्याचे मित्र त्याला घराबाहेर घेऊन आले आणि अचानक पाऊसही थांबला. कोणाला काहीही समजले नाही. अशीच एक घटना त्यासोबत एका उपहारगृहात घडली. उपहारगृहात पोहोचताच अचानक पाऊस सुरू झाला. डॉनला भुताची बाधा झाल्याचे उपहारगृह मालकाला वाटले आणि त्याने पवित्र क्रॉस त्याच्या कपाळावर लावला. मात्र असे केल्याने त्याची त्वचा जळाली. मात्र डॉन उपहारगृहाबाहेर पडताच पाऊस थांबला.

पॅरोलचा कालावधी पूर्ण झाल्यावर डॉनला पुन्हा तुरुंगात जावे लागले आणि तिथेही हाच प्रकार घडला. तुरुंगातील पोलिसही आश्चर्यचकित झाले. या नंतर तुरुंगात एका ख्रिस्ती धर्मगुरुला बोलावण्यात आले आणि त्याने धार्मिक पुस्तकाचे वाचन केले. ते पुस्तक सोडून इतर सर्व गोष्टी पावसात भिजल्या. मात्र थोड्याच वेळात पाऊस थांबला. डॉनसोबत असे का घडले याचा खुलासा आद्यपही झालेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या