मुरबाड, शहापूर तालुक्यातील सात हजार शेतकऱ्यांचा भात जाणार व्यापाऱ्यांच्या घशात

नरेश जाधव

मुरबाड, शहापुरातील ३६०६ शेतकऱ्यांनी आतापर्यंत भातविक्रीसाठी आदिवासी विकास महामंडळाकडे नोंदणी केली आहे. मात्र किचकट प्रक्रिया त्यातच नवीन वर्षांचे काऊंटडाऊन सुरू होऊनही भातखरेदी केंद्र सुरू होत नसल्याने जवळपास सात हजार शेतकऱ्यांनी नोंदणीकडे पाठ फिरवली आहे. याचा फायदा व्यापारी घेत असून कवडीमोल भावात भातावर डल्ला मारत आहेत. त्यामुळे हजारो क्विंटल भात व्यापाऱ्यांच्या घशात जात आहे.

आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार प्रादेशिक विभागांतर्गत शहापूर, मुरबाड या दोन तालुक्यात भातखरेदीसाठी शेतकऱ्यांच्या नोंदी केल्या जात आहेत. मात्र सर्व्हर डाऊन तर कधी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांना नोंदणी केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे वेळ, पैसा वाया जात असून आतापर्यंत केवळ ३६०६ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. त्यातच आता भात खरेदी नोंदणीकरिता ३१ डिसेंबर २०२५ ही शेवटची तारीख देण्यात आल्याने उर्वरित हजारो शेतकऱ्यांची नोंदणी बोंबलणार आहे. त्यामुळे जवळपास सात हजार शेतकऱ्यांना त्यांचे धान्य नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना विकावे लागणार आहे.

खरेदीसाठी मुहूर्त कधी मिळणार?
शहापुरात पाच व मुरबाड तालुक्यात तीन अशा एकूण आठ खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांनी शहापुरातील आटगाव केंद्राला नुकतीच भेट दिली असता उपस्थित शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींचे गाऱ्हाणे त्यांच्याकडे मांडले. त्यावेळी नोंदणी व धान खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करून तत्काळ कार्यवाही करण्याबाबत त्यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत, मात्र नवीन वर्ष जवळ आले तरी भात खरेदीला मुहूर्त मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

खरेदी केंद्र तत्काळ सुरू करा
सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला भात खासगी व्यापारी कवडीमोल भावात विकत घेत असून शासनाने मंजूर भात खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख बाळा धानके यांनी केली आहे.

शहापुरातील आटगाव व मुरबाड तालुक्यातील माळ या खरेदी केंद्रांवर प्रत्येकी दोन आयडी उपलब्ध करून दिले आहेत. नोंदणी प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेतली जात असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तत्काळ नोंदणी करून घ्यावी. आटगाव केंद्रात भात खरेदी करताना खर्डी येथे भात खरेदी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

तुषार वाघ,
उपप्रादेशिक अधिकारी, शहापूर