आतापासूनच धमक्या सुरू झाल्या, म्हणूनच हे सरकार आपल्याला खाली खेचायचंय; जयंत पाटील यांचा निर्धार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. ही यात्रेत तुळजापूर, धाराशिव येथील सभेत जयंत पाटील यांनी महायुतीच्या भ्रष्ट आणि दमदाटी, धमक्या देण्याच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच आता हे सरकार आपल्याला खाली खेचायचे आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी राज्यातील जनता आता महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. जनतेत भाजप सराकरविरोधात प्रचंड रोष आहे. 50 रुपयांची वस्तू यांच्या काळात 100 रुपयांची झाली. जीएसटी वाढवल्याने जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. या सरकारला शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्याशी काही देणेघेणे नाही. कर गोळा करून स्वतःचे कमीशन घेण्यात सरकार गुंतले आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये पळवले जात आहेत. तरीही सरकार काही बोलत नाही. तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. येत्या काळात आपल्याला महाराष्ट्र बेरोजगारी आणि महागाईमुक्त करायचा आहे, त्यासाठी हे भ्रष्ट सरकार आपल्याला खाली खेचावेच लागेल, असेही जयंत पाटील म्हणाले. सरकार योजनांवर जेवढा खर्च करत नाही, त्यापेक्षा जास्त खर्च जाहिरातींवर करण्यात येतो, हे दुर्दैवी आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

भाजपबाबत जनतेच्या मनात नाराजी आहे. त्यांनी आमदारांना हातीश धरून पक्ष फोडले. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच सत्तेसाठी सोबत घेतले. यामुळे भाजपची विश्वासार्हता कमी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपची रेटिंग कमी झाली आहे. सरकारमधील लोकं आता दमदाटीही करू लागले. विधानसभा निवडणुका अजून लांब असून आतापासूनच धमक्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार आपल्याला खाली खेचायचे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.