ठाकूरवाडी, तेलकोसवाडी, देवी चौक या भागातील वीजपुरवठा मंगळवारी रात्री चार ते पाच तास खंडित झाल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन शिवसैनिकांवरच महावितरणच्या अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे तर त्यांना अटकही करण्यात आली. या अरेरावीमुळे शिवसैनिक संतप्त झाले असून बाचाबाची तसेच धक्काबुक्कीमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, अटक केलेल्या शिवसैनिकांना कल्याणच्या न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
मुकेश पाटील आणि रुपेश धुमाळ या शिवसैनिकांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांची समस्या मांडली. मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वीज गुल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांचा आक्रोश बघून महावितरणचे अधिकारी जयेश मेंढारी हे देवी चौक येथील ट्रान्सफॉर्मरजवळ लाईटचे काम करण्यासाठी पोहोचले. या दरम्यान काही नागरिक व अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला आणि महावितरणचे अधिकारी जयेश मेंढारी यांना धक्काबुक्की झाली. पण शिवसैनिक मुकेश पाटील आणि रुपेश धुमाळ यांना अटक करण्यात आली.