मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनी येथील संयुक्त स्मशानभूमीच्या नूतनीकरण, सुशोभीकरण आणि इतर काम सुरू आहेत. मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची असून त्यात मोठा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.
स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयासह लाकडाच्या वखारी आणि भिंती ओलसर झाल्या आहेत. त्यात दरवाजे फुगल्याने रात्रीच्या वेळी कर्मचाऱ्यांना कधी दोरी लावून तर कधी जड वस्तू दरवाजात ठेवून रात्र काढावी लागते. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करून कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. सागर देवरे यांनी केली आहे.
टाटा कॉलनी येथील संयुक्त स्मशानभूमीचे नूतनीकरण, सुशोभीकरण आणि इतर काम सुरू आहेत. या कामांसाठी 8 कोटी 42 लाख 36 हजार 678 रुपयांचे टेंडर काढण्यात आले असून हे काम के. के. इंजिनीअरिंग या पंपनीला देण्यात आले आहे. हे काम मुंबई महापालिकेने आखून दिलेल्या गुणवत्ता आणि दर्जा यांचे पालन करण्यात आलेले नाही. कंत्राटदाराने केलेल्या कामाचा पहिल्या पावसातच बोजवारा उडाला आहे, असा दावा अॅड. सागर देवरे यांनी केला आहे.
पालिका म्हणते, सर्व काम निकषांनुसारच!
याबाबत महापालिकेच्या वरळी येथील अभियांत्रिकी केंद्र, प्रमुख अभियंता (इमारत परिरक्षण), मुंबई यांच्याकडे या कामाबाबत देवरे यांनी लेखी तक्रार केली होती. मात्र, तक्रारीला उत्तर देताना सुरू असलेली कामे ही सर्व प्रचलित मानके, निविदेच्या अटी आणि शर्तीच्या अधीन राहून पूर्ण करण्यात येत आहेत, असे मुंबई महापालिकेकडून लेखी कळवण्यात आले आहे.
नूतनीकरण केले म्हणून बजावली नोटीस
ख्रिश्चन स्मशानभूमीतील प्रार्थना शेडला गळती सुरू होती. पावसाळा असल्यामुळे शेडची दुरुस्ती तातडीने करणे जरूरी होती. त्यामुळे ख्रिश्चन संस्थांनी स्वखर्चाने शेडचे काम करून नूतनीकरण केले. याबाबत पालिकेच्या टी विभागाच्या आरोग्य विभागाने या संस्थांना नोटीस बजावली. मात्र, पालिकेला उत्तर देत योग्य तो खुलासा करण्यात आला आहे, अशी माहिती ख्रिश्चन संस्थांच्या प्रतिनिधीने दिली.