लातूरमध्ये बंद घर फोडले, 88 हजारांचा ऐवज लांबवला

लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 88120 रुपयांचा ऐवज पळवण्यात आला. या चोरीप्रकरणी सुनिल रामलिंग उंबरे रा.तुळजाभवानी नगर लातूर यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

सुनिल रामलिंग उंबरे आपल्या मुलीच्या परिक्षेसाठी पुणे येथे सहकुटूंब गेले होते. बंद घर पाहून अज्ञात चोरट्यांनी घर फोडले. शेजारी राहणाऱ्यांनी त्यांना मोबाईलवर चोरीबाबत माहिती दिली. घराचे कुलूप तोडून चोरटे घरात शिरले आणि कपाटातील सोन्याची 5 ग्रॅमची एक अंगठी, 6 ग्रॅमचे सोन्याचे गंठण, 2.5 ग्रॅमचे सोन्याचे टाप्स, 13 ग्रॅमचे सोन्याचे जिरामणी व गजरामणी, चांदीचे पाच प्रत्येकी एक तोळ्याचे करंडे, चांदीची लक्ष्मीची मुर्ती 2.5 वजनाची, चांदीच्या जोडव्या 3 तोळे, 1.5 तोळ्याची चांदीची गळयातील चैन आणि रोख रक्कम 6 हजार रुपये असा सुमारे 88120 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. अज्ञात व्यक्तीविरुध्द या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे