चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील दुकाने फोडली; लाखोंची चोरी

496

चाकुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितील नऊ आडत दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रूपये चोरल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात जवळपास 25 आडत दुकाने असून शुक्रवारी रात्री दुकाने बंद करून व्यापारी घराकडे गेले. शनिवारी पहाटे एका दुकानातील मुनीम आडतीकडे आला असता त्यांना दुकाने चोरट्यांनी फोडलेले आढळून आले. त्यांनी याची माहिती मालकाला दिली. अज्ञात चोरट्यांनी लोखंडी हत्याराने नऊ दुकानाचे शटर फोडून दुकानातील रोख रक्कम चोरल्याची उघड झाले आहे. तसेच दुकानात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे रॉडच्या मदतीने फोडण्यात आले आहे.

आप्पासाहेब पाटील ,संजय पाटील ,शिवशंकर हाळे,हणमंत इंद्राळे,प्रशांत केंद्रे ,समाधान डोंगरे,प्रदिप उस्तुर्गे,शंकर कोईलवाड,सुभाष नागरगोजे यांच्या दुकानाचे शटर तोडण्यात आले आहे. बाजारपेठेत दररोज लाखो रूपयांची उलाढाल असूनही रात्री एकही वॉचमन नसल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, पोहेकॉ.रामचंद्र गुंडरे, दत्ता थोरमोटे, तानाजी आरदवाड यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. तर स्थानिक गुन्हा शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहाणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, चोरट्यांचा काहीही सुगावा लागला नाही. आप्पासाहेब पाटील यांनी याबाबतच्यी तक्रार दाखल केली आहे. दुकानातील 69,500 रूपये चोरट्यांनी चोरल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. अज्ञात पाच चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र गुंडरे हे पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या