
शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील बेट भागातील घोडनदी आणि कुकडी नदी किनारच्या अनेक गावातील कृषी साहित्य , विदयुत रोहित्र चोरीच्या अनेक तक्रारी शिरूर पोलिसांत दाखल आहेत. सातत्याने होत असलेल्या वेगवेगळ्या चोऱ्यांमुळे या परिसरातील शेतकरी,नागरिक धास्तावले आहेत. काही चोऱ्यांचा तपास लावण्यात शिरूर पोलीस अपयशी ठरल्याची चर्चा नागरिकांमधून केली जात आहे. .
गुरुवारी रात्री टाकळी हाजी येथील संतोष विठ्ठल सोदक यांची स्प्लेंडर मोटासायकल (MH 12 UV 2541) चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. सोदक हे टाकळी हाजी – जांबुत रस्त्याच्या कडेला सोदक वस्ती येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या दोन मोटारसायकल घराजवळच्या परिसरात लावलेल्या होत्या. सकाळी त्यापैकी एक मोटारसायकलची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शेजारी राहत असलेले त्यांचे भाऊ कैलास सोदक यांच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे मोटारसायकलची चोरी केव्हा झाली याची माहिती मिळू शकली. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
शिरूरच्या बेट भागात या पुर्वी चोरट्यांनी चोरलेली कृषी साहित्य, खते – औषधांची दुकाने, किराणा दुकाने आणि घरफोडी या घटनांचा तपास आजवर लागलेला नाही. यामध्ये टाकळी हाजीतील दोन निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरफोडीचाही समावेश आहे. तसेच केबल आणि रोहीत्रांचीही मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे. आता शिरूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी नुकतीच सूत्रे हाती घेतली असून शिरूर शहरांमध्ये त्यांनी कारवाईचा बडगा सुरू केला आहे . शिरूर शहरातील फोर व्हीलर चोऱ्यांचा तपास लावण्यात ते यशस्वी झाले आहे.
टाकळी हाजी येथील पोलीस दुरक्षेत्र येथेही सहायक पोलिस निरीक्षक दिपक कारंडे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार , पोलीस हवालदार दिपक राऊत,देविदास खेडकर ,पो.कॉ. अंबादास थोरे, भास्कर बुधवंत,भागवत गरकळ यांची नव्याने नियुक्ती झाली आहे. या भागातील होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी तसेच मागील गुन्ह्यांची उकल करणे आणि चोरांना कायद्याचा धाक निर्माण करणे हे या नवीन पोलीस प्रशासनासमोर आव्हान असणार आहे.