
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जीपीएस यंत्रणेवर सायबर हल्ला झाल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी संसदेत मान्य केले. असे प्रकार रोखण्यासाठी देशातील अत्याधुनिक सायबर सुरक्षा यंत्रणा बसविण्यात येत आहे, अशी माहितीही नायडू यांनी राज्यसभेत दिली.
दिल्ली विमानतळावर झालेल्या ‘जीपीएस स्पूफिंग’बाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर नायडू म्हणाले की, विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक 10वर जीपीएसवर आधारित लॅंडिंग पद्धतीचा विमानांकडून वापर केला जात होता. त्या वेळी हा प्रकार घडला. वैमानिकांना चुकीचे आणि फसवे नेव्हिगेशन सिग्नल प्राप्त झाले होते.
स्पूफिंग म्हणजे काय?
जीपीएस स्पूफिंग म्हणजे एक प्रकारचा सायबर हल्लाच आहे. रिअल टाईम खरे सिग्नल ब्लॉक करून चुकीचे फसवे सिग्नल पाठविण्यात येतात. त्यातून चुकीचे ठिकाण आणि वेळ वैमानिकांना दिसू लागते. हेरगिरी, यंत्रणा बिघडविणे किंवा विमानांची दिशाभूल करण्यासाठी असा प्रकार केला जातो. दिल्लीत 7 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला होता आणि त्यामुळे 800पेक्षा जास्त उड्डाणे प्रभावित झाली होती. सुदैवाने कोणता अपघात झाला नाही.



























































