नगर जिल्हा परिषद मुख्यालयात थर्मल स्कॅनर यंत्रणा सुरू; सुरक्षेसाठी आरोग्यतपासणी

425

राज्य शासनाने लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या उपस्थितीचे प्रमाण 33 टक्क्यापर्यंत वाढवले आहे. तसेच प्रत्येक कार्यालयात सामाजिक अंतर तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नगर जिल्हा परिषद मुख्यालयात अधिकारी, कर्मचार्‍यांसह अभ्यागतांसाठी थर्मल स्कॅनरची व्यवस्था करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येकाचे शरीराचे तापमान मोजण्यात येत आहे. नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ही यंत्रणा कार्यान्वीत केली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यवस्था सुरु झाली आहे. कोरोनाविरुध्दच्या लढ्यात जिल्हा परिषदेची यंत्रणा रात्रंदिवस योगदान देत आहे. विशेषत: ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत जिल्हा परिषद संवर्गातील कर्मचारी सक्रिय आहेत. जवळपास 45 हजार कर्मचारी गावपातळीवर काम करीत आहे. त्याचवेळी सरकारने तिसर्‍या लॉकडाऊनमध्ये ऑरेंज, ग्रीन झोनमधील जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमध्ये 33 टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती मंजूर केली आहे. नगर जिल्हा परिषद मुख्यालयात शासनाच्या आदेशानुसार कर्मचारी आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आहेत. यापार्श्वभूमीवर मुख्यालयात आरोग्य संरक्षणाच्यादृष्टीने पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. अधिकारी, कर्मचार्‍यांसह अभ्यागतांचे थर्मल स्कॅनर यंत्रणेद्वारे शरीराचे तापमान तपासण्यात येत आहे. याशिवाय कार्यालयातही मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर, हात वेळोवेळी स्वच्छ धुणे अशा उपाययोजना कटाक्षाने केल्या जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या