सराइत चोरट्याला अटक, 7 लाख 20 हजारांचे दागिने जप्त

बंद घरांचे कुलूप तोडून चोऱ्या करणाऱ्या सराईताला चतुःश्रुंगी पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून 7 लाख 20 हजारांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्याच्याविरूद्ध 100 हून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला येरवडा कारागृहातून वर्ग करून घेतले आहे.

जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय 32,रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, औंध) असे अटक करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत सराइत गुन्हेगार असून त्याच्याविरूद्ध घरफोडीचे 100 हून जास्त गुन्हे दाखल आहेत. विश्रांतवाडीतील एका गुन्ह्यात तो  येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.

पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे घरफोडीचा तपास करताना औंधमधील शासकीय तंत्रनिकेतन कर्मचारी वसाहतीत सराइत जयवंतने चोरी केली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी न्यायालयाच्या परवानगीने जयवंतला येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 7 लाख 20 हजारांचे 153 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे, सारस साळवी, ज्ञानेश्वर मुळे, संतोष जाधव, तेजस चोपडे यांच्या पथकाने केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या