चोरीचा माल लपवला हौदात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाड पूर्व येथील कारखान्यात चोरी करून तांब्याच्या पट्टय़ांचे बंडल चोरणाऱया दोघांना कुरार पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. रामचंद्र बनेला महतो ऊर्फ बापू आणि मोहंमद हारुण सोराब ऊर्फ लाला अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांनी तांब्याच्या पट्टय़ांचे बंडल गोरेगावच्या चित्रनगरी येतील एका हौदात लपवून ठेवले होते.

तक्रारदार व्यावसायिक असून ते मालाड पूर्व परिसरात राहतात. त्यांचा जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग येथे कारखाना आहे. जुलै महिन्यात त्यांच्या कारखान्यात तांब्याच्या पट्टय़ांचा माल उतरवला जात होता. माल उतरवत असताना बापू आणि लालाने पाहिले होते. नशेसाठी पैशाची गरज असल्याने त्या दोघांनी रात्री तक्रारदार यांच्या कारखान्यात चोरी करून 1 लाख 84 हजार रुपये किमतीचे 11 तांब्याचे बंडल चोरले. ते बंडल हातगाडीवर टाकून ते दोघे चित्रनगरीत गेले. तेथील एका हौदात त्यानी ते बंडल लपवून ठेवले होते.

तक्रारदार हे दुसऱया दिवशी कारखान्यात आले असता चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. कुरार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बेळे यांच्या पथकातील सहायक निरीक्षक नितीन गिजे यांच्या पथकाने तपास सुरू केला. बापू हा कुरार परिसरात संशयास्पद फिरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने कारखान्यात चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले.

बापूच्या चौकशीत लालाचे नाव समोर आले. लाला हा चित्रनगरी येथील एका टेम्पोत झोपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चित्रनगरी येथून लाला याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. हौदात लपवून ठेवलेले तांब्याचे बंडल पोलिसांनी हस्तगत केले आहे. चोरीच्या गुह्यात त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.