इंदूरच्या क्रिकेटपटूची भामट्याने बॅग लांबवली, मॅच खेळण्यासाठी आला होता मुंबईत

233

सामना प्रतिनिधी । मुंबई

इंदूरमधील युवा क्रिकेटपटूची बॅग आणि मोबाईल भामट्याने लांबवल्याची घटना घडली. फसवणूकप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तक्रारदार देवेंद्र नेटावत हा मूळचा इंदूरच्या रहिवासी आहे. तो मध्य प्रदेश येथील एका क्रिकेट क्लबमधून खेळतो. गेल्या शुक्रवारी मुंबईत क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी तो आला होता. एक सामना खेळल्यावर तब्येत ठीक नसल्याने  इंदूरला जाण्यासाठी तो शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आला. प्रतीक्षागृहात तो मोबाईल चार्जिंगला लावून बसला होता तेव्हा एकजण त्याच्याकडे आला. ‘इथे का बसलास, तू सीसीटीव्हीमध्ये दिसतोयस. आमचे साहेब येतील त्यांच्यासोबत जावे लागेल’ अशा थापा मारल्या. त्यानंतर दोघेजण तेथे आले व ‘ऑफिसमध्ये चल’ असे सांगून देवेंद्रला काही अंतर नेले. बॅग घेऊन येताना तू पळून जाशील म्हणून मोबाईल दे असे भामट्याने देवेंद्रला सांगितले. त्याने मोबाईल काढून दिल्यावर तो बुकिंग हॉलमध्ये गेला असता तेथे कोणी नव्हते. भामट्याने तेथून त्याची क्रिकेटचे साहित्य असलेली बॅग लांबवली होती.

आपली प्रतिक्रिया द्या