
कुर्ला येथील एका खासगी बँकेचे एटीएम चोरटय़ाने लुटल्याची घटना समोर आली आहे. चोरटय़ाने एटीएममधील 3 लाख 7 हजारांची रोकड घेऊन पळ काढला आहे. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे कुर्ला येथे एका खासगी बँकेत चीफ मॅनेजर म्हणून काम करत आहेत. बँकेच्या आवारात एक एटीएम आहे. गुरुवारी त्या एटीएममध्ये तीन लाख रुपये टाकण्यात आले होते. मॅनेजरने तपासणी केली असता एकूण 8 लाख रुपये त्या एटीएममध्ये होते. शनिवारी बँकेला सुट्टी होती. दुपारी बँकेच्या सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्याने तक्रारदार यांना फोन केला. बँकेच्या एटीएमची पॅसेट दुसऱ्या बँकेच्या एटीएममध्ये दिसत असल्याचे सांगितले. याची माहिती त्यांनी बँकेच्या इतर सहकाऱयांना दिली. काही वेळात तक्रारदार तेथे पोहोचले, तेव्हा त्यांना बँकेचे एटीएम बंद अवस्थेत दिसले. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन जण एटीएममध्ये आले. त्यांनी एटीएमच्या खालचा भाग उघडून 3 लाख 7 हजार रुपये आणि पॅसेट बॅगेत भरली. घडल्याप्रकरणी त्यांनी नेहरू नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.


























































