मध्य रेल्वेची एसी लोकल ‘उंच’

783

पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेला एसी लोकल मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा पूर्ण होण्यासाठी काही काळ लागेल अशी शक्यता आहे. कारण, मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर चालवण्यात येणाऱ्या या लोकलची उंची 15 मिलीमीटरने जास्त आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या काही स्थानकांदरम्यान तिला वाहतुकीला अडथळे होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेची वातानुकूलित लोकल आल्यावर तांत्रिकदृष्ट्या सोयीचे असल्याने सीएसएमटी ते गोरेगाव हार्बर मार्गावर तिला चालवण्याची मध्य रेल्वेची योजना होती. मात्र, याला रेल्वेची उंची हा अडसर ठरू पाहत आहे. तांत्रिकदृष्ट्या एसी लोकलची उंची ही 4.270 मीटर इतकी असणं गरजेचं होतं. वास्तविक पश्चिम रेल्वेला मिळालेल्या दोन्ही एसी लोकल या 4.270 मीटरहून उंच आहेत. पण, खरी अडचण ही तिसऱ्या एसी लोकलची आहे. कारण तिची चाचणी हार्बर रेल्वेच्या गोरेगाव ते सीएसएमटी मार्गावर करण्यात येणार होती. पण, वडाळा ते सँडहर्स्ट रोड स्थानकांमधील दोन आणि चेंबूरजवळील एक अशा तीन जागांवर असलेले ब्रिटीशकालीन पूल या मार्गावरचा अडथळा बनत आहेत.

कोणत्याही ओव्हरहेड वायर आणि छत यांच्यातील जागा 2.50 मीटर इतकी अपेक्षित असते, तर धावत्या ट्रेनमध्ये हेच अंतर 2.70 मीटर इतकं असणं गरजेचं असतं. मात्र, उंची जास्त असल्यास पुलाखालून वाहतूक करणं शक्य होणार नाही. त्यामुळे तिसऱ्या लोकलची उंची कमी करणं हा एकमेव मार्ग आहे. ही तांत्रिक अडचण मूळ कंपनीतूनच दूर केली जाऊ शकते. त्यामुळे ही तिसरी लोकल चेन्नईला पाठवण्यात येईल, अशी शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या