
पिंपरखेड परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरू असताना, मृत शिवन्या बोंबे हल्ला घटनास्थळाजवळच तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची संख्या असून, वन विभागाकडून पिंजऱ्यांची संख्या वाढवून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
आठ दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या बोंबे या चिमुरडीचा मृत्यू झाल्याने पिंपरखेड आणि परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करून हा परिसर बिबटमुक्त करण्यासाठी संतप्त नागरिकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन करत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.
वन विभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंपरखेडच्या परिसरात दहा पिंजरे लावण्यात आले असून, मृत शिवन्या
बोंबे घटनास्थळी जवळच लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि.१८) रात्री बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. जेरबंद झालेली सहा वर्षे वयाची बिबट मादी असून, तिची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आली आहे, अशी माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली.
पिंपरखेड येथे घटनास्थळी तीन बिबट जेरबंद झाल्याने पिंपरखेड आणि परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या असल्याचे सांगितले जात आहे. वन विभागाकडून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सुरू असून, पिंजऱ्यांची अपुरी संख्या पाहाता बिबट्यांचा बंदोबस्त होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.