
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या मास्टर लिस्टवर असलेल्या आणि संक्रमण शिबिरात वास्तव्य करणाऱया मूळ भाडेकरू, रहिवासी अथवा त्यांच्या वारसदाराकडून पात्रता निश्चित करून गाळे वितरित करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. सबंधितांना 31 जानेवारीच्या रात्री 11.59 पर्यंत अर्ज करता येणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या रहिवाशांना हक्काचे घर मिळणार आहे.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतीमधील ज्या भाडेकरू, रहिवासी यांना निष्कासन सूचना देऊन इमारत खाली केली आहे व त्यांच्या मूळ इमारतीचा अरुंद भूखंड, आरक्षण, रस्ता रुंदीकरण इत्यादी कारणामुळे पुनर्विकास शक्य नाही. तसेच उपकरप्राप्त इमारती पुनर्रचित झालेल्या आहेत, परंतु कमी गाळे बांधले गेले आहेत अशा वंचित मूळ भाडेकरू, रहिवासी यांना यापूर्वी मंडळाद्वारे पुनर्रचित, पुनर्विकसित इमारतीमध्ये कायमस्वरूपी गाळा देण्यात आलेला नाही व त्यांचे वारसदार संक्रमण शिबिरात राहतात. अशा मास्टर लिस्टवरील मूळ भाडेकरू, रहिवासी अथवा त्यांचे वारसदार यांच्यासाठी सदर ऑनलाईन अर्ज प्रकिया राबविण्यात येत आहे. अर्जदाराची नोंदणी व ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता masterlist. mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन म्हाडाने केले आहे.
यापूर्वी पात्र घोषित केलेल्या अर्जदारांनी नव्याने अर्ज दाखल करू नये. तसेच ज्या अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केला आहे अशा अर्जदारांनी पुन्हा नव्याने अर्ज दाखल करू नये. ज्यांनी यापूर्वी मास्टर लिस्टकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज केलेला आहे, परंतु त्यांचे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे अशा व्यक्तींनी नव्याने ऑनलाईन अर्ज दाखल करावा.