नितीन गडकरींना पुन्हा धमकीचा फोन; घर, कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला येथील ऑरेंज सिटी चौकातील जनसंपर्क कार्यालयात पुन्हा एकदा दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकीचे फोन आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गडकरी यांच्या कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

मंगळवारी सकाळी तीन वेळा गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन आले. धक्कादायक म्हणजे, पुन्हा एकदा जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे फोन आले आहेत. यापूर्वी 14 जानेवारी रोजी देखील गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात अज्ञात व्यक्तीने दोन वेळा फोन करून धमकी दिली होती. पोलीस उपायुक्त राहुल मदने म्हणाले, मंगळवारी सकाळी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुजारीच्या नावाने धमकीचे तीन फोन आले. आज आलेला फोन बंगळुरूमधील एका युवतीचा आहे, तिचा मित्र कारागृहात शिक्षा भोगतोय. या प्रकरणी आम्ही गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.